
एकाच दिवसात ४५ कॉल , निरर्थक कॉलने पोलीस परेशान
अमळनेर : तालुक्यात ११२ डायल करून खोट्या तक्रारी करण्याचे प्रमाण वाढले आहे यामुळे पोलिसांचा वेळ आणि इंधन वाया जात आहे. यापुढे खोटा किंवा विनाकारण ११२ डायल केल्यास गुन्हे दाखल केले जातील असा इशारा पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिला आहे.

११२ डायल सेवा जनतेच्या सुरक्षेसाठी असून अवघ्या १५ मिनिटाच्या आत पोलीस घटनास्थळी पोहचुन तक्रारींचे निराकरण केले जाते इतकी तत्पर सेवा पोलिसांकडून दिली जात आहे. मात्र काही टवाळखोर , दारुडे ,वात्रट लोक विनाकारण ११२ डायल करतात आणि त्यात पोलिसांचा वेळ आणि वाहनाचे इंधन वाया जात आहे. ६ मे रोजी ८ कॉल , ७ रोजी ११ , ८ रोजी ४५ कॉल पडले , ९ रोजी २३ कॉल पडले पोलिसांची तारांबळ उडाली. यात काही कॉल निरर्थक व खोटे निघाले. एका बहादरने तर एस टी मध्ये मला जागा मिळाली नाही जागा मिळवून द्या म्हणून कॉल केला. पोलीस देखील माणसे आहेत त्यांना विनाकारण त्रास दिल्यास त्यांच्या कार्यक्षमतेवर व कार्यपद्धतीवर परिणाम होतील. ११२ चा प्रत्येक कॉल गांभीर्याने घेऊन जनतेला न्याय देण्यासाठी तत्परता दाखवण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले आहेत. त्यामुळे हातातली सर्व कामे सोडून ११२ वरील कर्मचारी धावत पळत जातात. प्रत्येक कॉल वर काय कार्यवाही केली याचा अहवाल देखील लगेच द्यायचा असतो म्हणून यापुढे जर बनावट किंवा निरर्थक ११२ डायल केल्यास संबंधित व्यक्तिविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी असा इशाराही पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिला आहे.




