
अमळनेर : राष्ट्रीय जनगणना १५ तारखेपासून सुरू होत असून या कार्यास हातभार लावणे देशातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून नागरिकांनी १५ तारखेपूर्वी स्व जनगणना करून घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे , तहसिलदार रुपेशकुमार सुराणा व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी संयुक्त रित्या केले आहे.

स्व जनगणनेत नागरिकांची प्राथमिक माहिती नोंदली जाऊन त्याचा आय डी तयार होतो. यामुळे प्रगणकाला जनगणना करणे सोपे जाऊन चूका होणार नाहीत. कारण नागरिकांनी माहिती स्वतः भरलेली असेल. त्यामुळे माहितीत सत्यता असेल वेळ कमी लागेल. नागरिकांनी आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून https://se.census.gov.in या लिंकला गूगल वर ओपन केल्यास ओटीपी आल्यावर आपली सर्व माहिती त्यात क्रमाक्रमाने भरता येईल माहिती पूर्ण झाल्यावर तुम्हाला मेल तसेच मेसेज द्वारे जनगणना आय डी मिळेल. तो आय डी प्रगणक आल्यावर नागरिकांनी त्यांना दाखवावा. स्व गणना करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असल्याने नागरिकांनी तत्परतेने या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अमळनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती अशोक पाटील , सचिव डॉ उन्मेष राठोड , डी ए धनगर यांच्या सहकार्याने कर्मचार्यांना स्व जनगणनेची माहिती देण्यात येऊन जनगणना करण्यात आली.
१६ पासून घरोघरी प्रगणक येतील १६ मे पासून प्रत्यक्ष घरोघरी जनगणना सुरू होणार असून एकूण ३४ प्रश्न नागरिकांना विचारले जाणार आहेत. ग्रामीण भागात तहसील खात्याच्या मार्गदर्शनाखाली ३३७ प्रगणक प्रत्यक्ष काम करणार असून ५० सुपरवायझर त्यावर नियंत्रण ठेवतील. तर शहरी भागात नगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली १९४ प्रगणक नेमून दिलेल्या प्रभागात गल्लीत प्रत्येक घरी जाऊन जनगणना करणार आहेत ३२ सुपरवायझर त्यांच्यावर नियंत्रण ठेवतील. नागरिकानी प्रगणकाना सहकार्य करण्याचे आवाहन प्रांत मयूर भंगाळे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व मुख्याधिकारी गणेश शिंदे , उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.




