
अमळनेरच्या रहिवासी असलेल्या मुंबई पोलिसासह पत्नीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
अमळनेर : व्हाट्सएपवर अश्लील संदेश टाकून महिला पोलिसाला तिचे नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या अमळनेर येथील मूळ रहिवासी असलेल्या खार मुंबई येथील पोलिसावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका महिला कॉन्स्टेबल ने फिर्याद दिली की रवींद्र शिवाजी बोरसे रा ताडेपुरा अमळनेर हल्ली मुक्काम सर्वोदय नगर अंबरनाथ पश्चिम जि ठाणे मुंबई पोलीस याला ६ लाख ६० हजर रुपये आणि ५ ग्राम सोन्याची अंगठी दिली होती. वारंवार त्याला पैसे आणि अंगठी मागितली असता त्याने नकार दिला होता. याबाबत त्या महिला कॉन्स्टेबलने फसवणूक झाली म्हणून मुंबई पोलीस कमिशनर यांच्याकडे तक्रारही केली होती. त्याची चौकशी सुरू आहे. त्याचे वाईट वाटल्याने रवींद्र बोरसे , त्याची पत्नी योगिता बोरसे आणि इतर दोघांनी तिला व तिच्या आजीला ४ मे रोजी मारहाण केल्याने तिने अदखलपात्र गुन्ह्याची नोंद अमळनेर पोलीस स्टेशनला केली होती. २५ रोजी रवींद्र बोरसे यांनी त्या महिला कॉन्स्टेबल ला व्हाट्सएप वर संदेश देऊन तू जर माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला तर मी माझ्याजवळील आणि माझ्या पत्नी जवळील तुझे नग्न व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. तुझे ५ लाख ७० हजार आणि अंगठी तुला एक रुपया पण भेटणार नाही. नंतर व्हाट्सअपवर अश्लील शिवीगाळ करून तुझी बदनामी करतो खोटे गुन्हे दाखल करतो अशी धमकी दिली. महिलेने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून कॉन्स्टेबल रवींद्र बोरसे आणि त्याची पत्नी योगिता बोरसे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७९ ,तसेच कलम ३५१(२),३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सिद्धांत शिसोदे करीत आहेत.




