
Oplus_131072
अमळनेर : तालुक्यात मांडळ येथे अचानक आग लागून खळे , शेती साहित्य , चारा जाळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ३ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. ४ रोजी सकाळी पर्यंत आग धगधगत होती.
३ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मांडळ येथील मराठी शाळेच्या समोरील भानुदास पाटील ,ललित पाटील आणि रंजन पाटील यांच्या खळवाडीस आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने एकच धावपळ उडाली. खळ्यात असलेल्या जनावराना पटापट बाहेर काढण्यात आले. मांडळ ग्रामस्थांनी मिळेल त्या साहित्याने पाणी टाकून टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदर्शन पवार यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे व मारवड पोलिसांना माहिती देऊन अग्निशमन बंम्ब मागवला. मुख्याधिकारी शिंदे यांनी अग्निशमन दल प्रमुख गणेश गिरी याना बंम्ब तातडीने नेण्याच्या सूचना केल्या. बंम्ब येतो तोपर्यन्त गावकऱ्यांच्या मदतीने बरीचशी आग नियंत्रणात आली होती. अग्निशमन कर्मचारी आनंदा झिम्बल , भिकन पठाण यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. एक गाडी खाली होताच दुसरा बंम्ब यायला वेळ लागेल म्हणून गावातूनच पाणी भरून आग विझवण्यात आली. तब्बल चार पाच तासानंतर आग आटोक्यात आली. मात्र सकाळ पर्यंत आग धगधगत होती.
आगीत भानुदास हिम्मतराव पाटील , ललित पाटील यांचे ठिबक नळया ,शेती साहित्य , लाकडी बैलगाडी ,नांगर , पाम्भर इतर साहित्य तसेच ३० – ४० ट्रॅक्टर भरून चारा , रंजन पाटील यांचे पाईप आणि चारा जळून खाक झाला. त्यांचा एक बैल देखील आगीत भाजला गेला. खळ्यात बांधलेले शेड देखील पडून गेले असे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले.




