
Oplus_131072
अमळनेर : डीवायएसपी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकानी तालुक्यात गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर धाडी टाकून सुमारे दोन लाख रुपयांची दारू व रसायन जप्त करून आठ हातभट्या उध्वस्त केल्या आहेत. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे गावठी दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे देखील जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे मारण्यात आले.
तालुक्यातील हिंगोणे सिम येथे गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू असल्याची माहिती डीवायएसपी विनायक कोते याना ३ रोजी मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज ,पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे , मुकेश साळुंखे , भरत ईशी , मिलिंद सोनार , लक्ष्मीकांत शिंपी , हितेश बेहरे , उज्वल पाटील यांना सोबत घेऊन रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास हिंगोणे सिम येथे छापा टाकला असता नवल रोहिदास कोळी यांच्या शेताजवळील गावठाण जागेत काटेरी झुडुपात गावठी दारूच्या चार भट्ट्या सुरू असल्याच्या दिसून आल्या. त्या सोपान गुलाब कोळी याच्या असल्याचे समजले. पोलिसांनी चारही भट्टीवरील २४ हजार रुपये किमतीचे २०० लिटरचे चार ड्रम मधील ८०० लिटर उकळते रसायन , आणि १४ ड्रम मधील ८४ हजार रुपयांचे २८०० लिटर गूळ नवसागर मिश्रित कच्चे रसायन आणि ५ हजार रुपयांची १०० लिटर पक्की दारू असे सुमारे १ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करून भट्ट्या उध्वस्त केल्या. सोपान कोळी याला अटक करून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम ६५ (फ)(ब)(क)(ई)प्रमाणे मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे मंगळ ग्रह मंदिरासमोर मोकळ्या जागेत मयूर देवसिंग पवार रा कृष्णा पेट्रोलपंप समोर चोपडा रोड हा गावठी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ५ हजार रुपयांची दारू व कच्चे रसायन जप्त करण्यात आले. हितेश बेहरे यांच्या फिर्यादीवरून कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली जळोद येथे छापा टाकून आबा कोळी याची गावठी दारूची हात भट्टी उध्वस्त करून तेथील ६० हजार रुपये किमतीचे १२ ड्रम मधील ६०० लिटर रसायन व गावठी दारू बनवण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. आबा कोळी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड , हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील , प्रशांत पाटील ,नितीन कापडणे यानी मच्छी बाजार मध्ये छापा टाकून दिलीप दामोदर पाटील रा तांबेपुरा हनुमान मंदिराच्या मागे याला गावठी दारू विकताना पकडले. त्याच्याजवळून दोन हजार रूपयांची दारू जप्त करण्यात आली. तसेच ३ रोजी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी चांदणी कुऱ्हे येथे चिखली नदीच्या काठी भिका अण्णाराव शिंदे हा दारूची भट्टीवर दारू गाळत असताना आढळून आला. १० हजार रुपयांचे गुळमिश्रित रसायन नष्ट करून दारूचा नमुना जप्त करण्यात आला. अमळनेर पोलीस स्टेशनला ६५(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पळासदळे येथे सजन अर्जुन भिल हा गावाबाहेर काटेरी झुडुपात दारूच्या भट्टीवर पत्र्याच्या ड्रम मध्ये रसायन ढवळताना आढळून आला. पोलिसांनी १२ हजार रुपये किमतीचे २४० लिटर गूळ मिश्रित रसायन नष्ट केले. या सर्व कारवाया पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली , पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज , उपनिरीक्षक कविता ठाणगे , लक्ष्मीकांत शिंपी , विनोद सोनवणे , विनोद संदानशीव , राजेंद्र देशमाने , मिलिंद सोनार ,सुनील तेली यांनी केल्या आहेत.




