
अमळनेर :- तालुक्यातील कळमसरे येथील ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर पाटील हे नियत वयोमानानुसार 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त झाल्याने ग्रामपंचायतीतर्फे सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्रसिंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमिलाबाई चौधरी, मिनाबाई कुंभार, दिनकर चव्हाण, देविदास बडगुजर, मंगल भिल, हेमंत चौधरी तसेच ग्रामपंचायत अधिकारी संघटना, विकास सोसायटी चेअरमन, महसूल कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या प्रतिनिधी महिला,पत्रकार बांधव व सर्व कळमसरे ग्रामस्थांतर्फे सेवापूर्ती सपत्नीक शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार सोहळा नुकताच ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच नवीन नियुक्त झालेले ग्रामपंचायत अधिकारी नितीन भूपेंद्रसिंग पाटील यांच्या स्वागत व सत्कार सोहळा देखील यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे सचिव नितीन पाटील तसेच देविदास माळी हे होते. संपूर्ण कळमसरे ग्रामस्थांनी माझा जो एवढा मोठा सेवापूर्ती सत्कार सोहळा केला तो म्हणजे माझ्या केलेल्या कामाची पावती म्हणून मला मिळाली त्यामुळे मी संपूर्ण गावाचा ऋणी राहील. आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी मी सेवा दिली त्या माझ्या 35 वर्षांच्या सेवाकाळात एवढा सन्मान मला कुठेही मिळाला नाही. अशी प्रतिक्रिया निवृत्त ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली.
ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ज्या माणसाचा या प्रमाणात सत्कार सोहळा केला जातो त्यावरून त्या माणसाचे कर्तुत्व या गावासाठी किती मोठे असेल असे आपल्या अध्यक्षीय भाषणात संजय पाटील म्हणाले. यावेळी सचिव नितीन पाटील गावातील ग्रामस्थ किसनसिंग राजपूत, निवृत्त प्राचार्य जे वाय कुंभार, दस्तगीर पिंजारी तसेच ज्ञानेश्वर पाटील यांच्या पत्नी उषा पाटील नवीन नियुक्त झालेले नितीन भूपेंद्रसिंग पाटील यांनी आपल्या मनोगत सांगितले की ज्ञानेश्वर पाटील यांनी ज्या ज्या गावात सेवा दिली त्या त्या गावांचा विकासच झालेला आहे व त्यांनी केलेल्या कार्याचे सर्वांनी कौतुक केले. यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हिरालाल पाटील तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी भागवत कोळी, प्रदीप महाजन योगेंद्र पाटील गुलाब वडर बुधा वडर सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.




