
Oplus_131072
कोणताही ओटीपी न येता झाला प्रकार, सायबर गुन्हा दाखल
अमळनेर : नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या योगेश आधार पवार (वय ३२, रा. ताडेपुरा, अमळनेर) यांच्या IDBI बँक खात्यातून दिनांक ५ जून २०२६ रोजी सकाळी ११.३८ वाजता सायबर गुन्हेगारांनी कोणताही OTP किंवा बँकेचा कॉल न येता दोन टप्प्यांत ९४ हजार ९९९ रुपये ९७ पैसे काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पवार यांच्या IDBI बँक खात्यातून पहिल्या व्यवहारात ५०,००० रुपये तर दुसऱ्या व्यवहारात ४४,९९९.९७ रुपये असे एकूण ९४,९९९.९७ रुपये कंभपती रमेश व अभिषेक नायक या व्यक्तींच्या नावे पाठवण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पवार यांच्या मोबाइलवर कोणताही ओटीपी आला नाही, तसेच बँकेकडून कोणताही पुष्टीकरण कॉल देखील आला नाही. केवळ पैसे कपात झाल्याचे मॅसेज पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी त्वरित आपले मित्र गौतम बिऱ्हाडे, सतीश बिऱ्हाडे आणि अनंत संदानशिव यांना याबाबत सांगितले. यातील अनंत संदानशिव यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ सायबर क्राइमच्या राष्ट्रीय पोर्टलवर (www.cybercrime.gov.in) जाऊन ऑनलाइन तक्रार दाखल केली. त्यांनी व्यवहाराची वेळ, रक्कम, बँकेचा तपशील आदी माहिती पोर्टलवर नोंदविली. यामुळे पुढील तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे राहुल चव्हाण यांनीही तपासला सुरुवात केली आहे. , आयडीबीआय बँकेला व्यवहार तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची फसवणूक ‘सिम क्लोनिंग’, ‘मोबाइल हॅकिंग’ किंवा ‘प्री-अप्रूव्ड ट्रांझॅक्शन’द्वारे होऊ शकते. तसेच, कोणताही ओटीपी न आल्याने बँकेच्या व्यवस्थेतही गंभीर त्रुटी असल्याचे संकेत मिळतात.




