आता ग्रामसभेतील निर्णयानंतर सरपंच होणार पायउतार…
अमळनेर:- तालुक्यातील दहिवद येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर ११ सदस्यांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत अविश्वास मंजूर केला. एकूण 13 सदस्यांपैकी 2 सदस्य ह्या ग़ैरहजर राहिले. लोकनियुक्त सरपंच सुषमा वासुदेव देसले यांच्याविरोधात ११ सदस्यांनी मतदान केले यामुळे तहसिलदार मिलिंद वाघ यांच्या समक्ष अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.
गावातील विकास सोसायटी निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी संपूर्ण गावाची इच्छा होती. बिनविरोध होण्याची परिस्थिती देखील होती. मात्र सरपंचांनी ऐनवेळेस जबरदस्तीने पॅनल उभे केले, यात मध्यस्थीची बोलणीही झाली, पण आम्हाला ठराविक लोक पॅनलमध्ये चालणार नाहीत, हा व्यक्ती द्वेष दिसून आल्याने निवडणूक लागली. तसेच सरपंचांना लोकनियुक्तपदावर निवडून आणण्यासाठी ज्या लोकांनी मदत केली होती. त्यांचे म्हणणे देखील सतत धुडकावून लावल्याने राग आणखी वाढत गेला. विकास सोसायटी निवडणूक झाल्यानंतर सरपंच पॅनलचा धुव्वा उडला. लोकनियुक्त सरपंचांना जनाधार राहिला नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले, समोरील पॅनलचे लोक कारण नसताना दुखावले गेले आणि हेच अविश्वासाचे दाखल करण्याचे कारण ठरल्याची चर्चा आहे
नवनियुक्त सोसायटी पॅनलप्रमुख प्रवीणआबा, गोकूळ गबा माळी, माजी उपसभापती सुभाष देसले,रवींद्र भाईदास देसले यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. दहिवदच्या लोकनियुक्त सरपंचांविरोधात उपसरपंच देवानंद बहारे, माणिकराव भदाणे, वर्षा देसले, शिवाजी पारधी, मालुबाई माळी, हिराबाई भिल, योगिता गोसावी, आशाबाई माळी, सुनील पाटील, वैशाली माळी, रवींद्र माळी यांनी मतदान केलं. अविश्वास ठरावावेळी स्वतः सरपंच यांच्यासह २ सदस्य अनुपस्थित होते.