
न.प.च्या अग्निशमन विभागाने दिले मांजरीला जीवदान…
अमळनेर:-न्यू प्लॉट परिसरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या पुरातन विहिरीत एक मांजरीच पिल्लू पडलेलं असताना केवळ “प्राणिमात्रावर दया” या धोरणानुसार अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या टीमने सुमारे दोन तास रेस्क्यू ऑपरेशन राबवून सुखरूपपणे त्या पिलास बाहेर काढून जीवदान दिले.
विशेष म्हणजे तब्बल 16 तास विहिरीत राहिलेलं हे मांजरीच पिल्लू जिवंत बाहेर आल्याने उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.अमळनेर येथील व्यापारी प्रकाशचंद पारख यांचा हा वाडा असून याठिकाणी डॉ.दीपक धनगर यांचे सिद्धीविनायक हॉस्पिटल थाटले आहे. याठिकाणी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मागील बाजूस असलेल्या पुरातन मात्र जिवंत विहिरीत मांजरीच पिल्लू पडल्याची माहिती जितेंद्र पारख यांना मिळाल्याने त्यांनी तेथे धाव घेऊन अग्निशमन विभागाचे प्रमुख नितीन खैरनार यांना माहिती दिली,त्यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची परवानगी घेऊन तातडीने विहिरीजवळ धाव घेतली मात्र रात्रीचा अंधार झाला असल्याने विहिरीत उतरणे शक्य झाले नाही. त्यानंतर सकाळी 9 वाजेलाच त्यांची टीम पुन्हा हजर झाली यावेळी त्यांच्या मदतीसाठी अमळनेर पत्रकार संघ आणि न्यू प्लॉट परिसर विकास मंचचे अध्यक्ष चेतन राजपुत, जितेंद्र पारख, सामाजिक कार्यकर्ते पराग ताथेड, महेश राजपूत उपस्थित झाले होते.अग्निशमन प्रमुख नितीन खैरनार यांच्या सुचनेनुसार फायरमन दिनेश बिऱ्हाडे, जफर पठाण, फारुक शेख ,मच्छिंद्र चौधरी, परेश उदयवाल, आनंदा झीबल यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले,दिनेश बिऱ्हाडे हे स्वतः जीव धोक्यात घालून विहिरीत उतरले. विहीर जुनी असल्याने आतमध्ये सर्प वैगरे असण्याची दाट शक्यता होती मात्र बिऱ्हाडे यांनी एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवायचा म्हणून स्वतःची पर्वा केली नाही, ते पिल्लू आतमध्ये कपाऱ्यात लपले असल्याने बाहेर काढणे अवघड होते मात्र परिश्रमाने बिऱ्हाडे यांनी त्यास बाहेर काढले यावेळी बिथरलेल्या पिल्लाने बऱ्यापैकी त्यांच्या हाताला चावाही घेतला मात्र जखमी होऊनही त्यांनी पिल्लास न सोडता बादलीत टाकून वर काढले आणि सर्वानी सुटकेचा श्वास सोडला.
खरोखरच अग्निशमन विभागाचे कार्य सॅल्युट करण्यासारख असल्याची भावना जितेंद्र पारख यांनी व्यक्त करत प्राणिमात्रावर दया करा ही म्हण ते जोपासत असल्याचे सांगितले.सदर कामगीरीबद्दल न्यू प्लॉट विकास मंचच्या वतीने अध्यक्ष चेतन राजपूत तसेच जितेंद्र पारख, पराग ताथेड,महेश राजपूत यांनी संपूर्ण टीमचा सत्कार करत नगरपरिषद आणि मुख्याधिकारी यांचे आभार व्यक्त केले.सदर मांजरीच्या पिल्लास तिच्या शोधात असलेल्या मातेजवळच सोडण्यात आले.







