
लिफ्ट दुरुस्तीचे काम करीत असताना १६ व्या माळ्यावरून पडले खाली…
अमळनेर :- तालुक्यातील शिरुड येथील दोन तरुणांचा सुरत येथे लिफ्ट दुर्घटनेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली आहे.
शिरूड येथील रहिवासी निलेश प्रल्हाद पाटील (वय 28) व आकाश सुनिल बोरसे (वय 22) हे दोघे सुरत येथील पांडेसरा भागात प्लॅटिनियम प्लाझा नामक सतरा मजली इमारतीत लिफ्ट बसविण्याचे काम करत होते.16 व्या मजल्यावर लिफ्ट दुरुस्त करण्याचे काम करीत असताना त्यांनी शिडीची मदत घेऊन त्यावर उभे राहून दोन्ही जण काम करीत होते. एकाच शिडीवर दोन्ही काम करीत असतांना सीडी सरकल्याने दोघांचा तोल जाऊन ते 16 व्या मजल्यावरुन खाली पडले. उंचीवरून पडल्याने त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.तेथील काही कामगारांनी परिसरात काम करणाऱ्या कामगारांना ही घटना सांगितली.घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविले. दरम्यान दोन्ही जण शिरुड येथे गणेशोत्सव साजरा करून मजुरी साठी सुरत येथे गेले होते.मयत आकाश बोरसे च्या पश्चात आई वडील व एक मोठा भाऊ आहे. तर आकाश चे वडील शेती व्यवसाय करीत असून हलाखीची परिस्थिती असल्याने आकाश हा गेल्या दोन तीन महिन्यापासून सुरत येथे मजुरी करण्यासाठी गेलेला होता.तर निलेश पाटील यांच्या घरची परिस्थिती ही जेमतेम असून वडील शेती व्यवसाय करतात तर आईचे मे महिन्यात अल्पशा आजाराने निधन झाले होते. दोघा तरुणांच्या अपघाती मृत्युने शिरूड गावावर शोककळा पसरली आहे.







