टाकरखेडा येथे बचत गटाच्या सदस्यांचे नेतृत्व विकास प्रशिक्षणाचे आयोजन…
अमळनेर:- तालुक्यातील टाकरखेडा येथे दिनांक १६ सप्टेंबर रोजी इंदूताई फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मातोश्री इंदूताई फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे स्वयं सहायता बचत गटाच्या सदस्यांचे नेतृत्व विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. कंपनीला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून मिळालेल्या कृषी औजारे बँकेचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कंपनी स्थापनेची रूपरेषा व प्रास्ताविक भटु आबा पाटील यांनी मांडले. श्रीकांत झांबरे नाबार्ड जळगांव, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अमळनेर येथील व्यवस्थापक यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. कुरबान तडवी, प्रकल्प संचालक आत्मा जळगाव यांनी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या कंपनीने केलेल्या कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढून सदैव मदत करण्याचे आश्वाशित केले. एक दिवस माझ्या बळीराजा साठी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा शेतकरी गट स्थापन करून लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी डी. व्ही. जाधवर यांनी केले. प्रविण पाटील, कृषी सहाय्यक यांनी PMFME व महाडीबीटी पोर्टल वरील योजना विषयी माहिती दिली. यानंतर कुरबान तडवी, डी. व्हि. जाधवर, तसेच स्मार्ट प्रकल्प जळगांवचे झांबरे यांनी राज्य पुरस्कृत कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास प्रकल्पातील व क्रॉपसॅप सर्वेक्षण फिक्स प्लॉटचे शेतकरी शिवाजी वामन पाटील यांच्या शेताला भेट देऊन पिकाची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांना संभाव्य फुलगळ व बोंडसड पासून होणाऱ्या नुकसानीबद्दल अवगत करून त्यावरील उपाययोजना सांगितल्या. यावेळी कृषी सहाय्यक प्रविण पाटील, अमोल कोठावदे, निलेश पाटील आत्मा बीटीएम भूषण पाटील आदी कर्मचारी उपस्थीत होते.