आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, मुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्र्यांची घेणार भेट…
अमळनेर:- मतदारसंघात असलेल्या अमळनेर तालुक्यातील सर्व आठ महसुल मंडळे आणि पारोळा तालुक्यातील बहादरपुर महसुल मंडळात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी या मागणीचे निवेदन आ.पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
सदर मागणीसाठी आमदार पाटील यांनी आधी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांना देखील निवेदन दिले असून लवकरच त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ते मांडणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सदर नुकसान झाल्याबाबत प्राथमिक पाहणी केल्यानंतर निदर्शनास आले आहे. परंतु याठिकाणी सदोष पर्जन्यामापक यंत्रणेने पर्जन्यमानाची चुकीची आकडेवारी दिल्यामुळे प्रशासनाकडून शेतीपिकांचे पंचनाम्याचे आदेश अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाहीत.तरी अमळनेर तालुक्यातील अमळनेर, नगांव, मारवड, भरवस, शिरुड, वावडे, पातोंडा, अमळगांव या महसुल मंडळातील व पारोळा तालुक्यातील बहादरपुर महसुल मंडळातील सततच्या पावसामुळे व अतिवृष्टिमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात यावेत अशी विनंती आमदारांनी केली आहे.
ढगफुटी मुळे शेळावे महसूल मंडळातही केली पंचनाम्याची मागणी…
पारोळा तालुक्यातील शेळावे महसुल मंडळात दि.16 व 17 सप्टेंबर रोजी ढगफटी सदृश्य झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराज्याच्या शेतीपिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आमदारांसह स्थानिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी, महसुल विभागाचे अधिकारी व कृषि विभागाचे अधिकारी यांच्या प्राथमिक पाहणी अंतर्गत निदर्शनास आले असून.येथेही सदोष पर्जन्यामापक यंत्रणेने पर्जन्यमानाची चुकीची आकडेवारी दिल्यामुळे शेतीपिकांच्या नुकासानीचे पंचनाम्याचे आदेश अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाहीत. तरी शेळावे महसुल मंडळातील शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचेही पंचनाम्यांचे आदेश देण्यात यावेत अशी विनंती आमदार अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.