
कळमसरे येथून पाच गुरे चोरली, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण…
अमळनेर:- तालुक्यात ग्रामीण भागात गुरे चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला असून कळमसरे येथून पाच गुरे चोरीला गेली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळमसरे येथील मेघराज धनसिंग राजपुत हे दिनांक ६ रोजी वासरी जोरजोरात हंबरडा फोडत असल्याने पहाटे तीन वाजता उठून पाहिले असता गोठ्यात गाय बांधलेली दिसून आली नाही. तसेच गायीच्या खुट्यास बांधलेला दोर कापलेला दिसून आला. फिर्यादी गावात शोध घेत असताना गावातील जितेंद्र दादुसिंग पाटील यांची एक गाय, सतीश महारुसिंग पाटील यांचे दोन गोऱ्हे व एक वासरी ही लंपास असल्याचे लक्षात आले. सदर शेतकऱ्यांनी मिळून परिसरात शोध घेतला असता ते मिळून न आल्याने अज्ञात चोरट्यांनी पशुधन चोरुन नेल्याचा खात्री झाली. त्यावरून मारवड पोलिसांत पाच जनावरे चोरुन नेल्याची फिर्याद देण्यात आली भादवी कलम ३७९ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना. मुकेश साळुंखे हे करीत आहेत.







