
१६ नोव्हेंबर रोजी कार्तिक कृष्णपक्ष अष्टमीला मुख्य यात्रा…
अमळनेर:- तालुक्यातील गोवर्धन, मारवड, बोरगाव सह परिसराचे आराध्य दैवत व भारतातील तीन स्वयंभू भैरवनाथापैकी एक असलेल्या श्री कालभैरवनाथांचा तीन दिवसीय यात्रोत्सव दिनांक १५ पासून सुरू होईल. त्यात कार्तिक कृष्ण पक्षातील अष्टमीला मुख्य यात्रोत्सव असून त्यादिवशी महाप्रसाद भंडारा म्हणून सकाळी ९ पासून वाटप करण्यात येणार आहे.

माळण नदी पात्रात दिनांक १५,१६,१७ असा तीन दिवस यात्रोत्सव साजरा करण्यात येणार असून यासाठी भैरवनाथ मंदिर संस्थान व पोलीस प्रशासन यात्रोत्सव यशस्वीतेसाठी सज्ज झाले आहे.
तालुक्यातीलच नाही तर राज्यातील अनेक ठिकाणचे भाविकांचे श्रद्धास्थान व परिसराचे आराध्य दैवत असलेल्या भारतातील तीनच ठिकाणी स्वयंभू स्थान असलेले श्री कालभैरवनाथ मंदिराचा महिमा सर्वदूर असल्याने त्यातील माळण नदीकाठी असलेल्या स्वयंभू श्री काळभैरवनाथ मंदिराचा मारवड गोवर्धन बोरगावचे ग्रामस्थ सालाबादप्रमाणे कार्तिक अष्टमीला जयंतीच्या रुपात कालभैरव नाथांचा यात्रोत्सव साजरा करीत असतात. दरवर्षी धुमधडाक्यात यात्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी होऊन दिवसभर महाप्रसाद वाटप करून वरील तिन्ही गावातीलच आबालवृद्ध दिवसरात्र सेवा देऊन कालभैरव नाथांची रक्षा (धुनी ) कपाळी लावून नवसपूर्तीसाठी विशेष गर्दी होते, कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे यात्रोत्सव दोन वर्ष साजरा केला नव्हता. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मंगळवारी दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजता धुप ध्यान मंगल आरती करून सायंकाळी ७ वाजता भव्य पालखी सोहळ्याची मिरवणूक व रात्री ९ पासून रात्रभर अखंड एकतारी भजनी मंडळ भजन करून भैरवनाथ जागर करतील तर दिनांक १६ रोजी मुख्य यात्रा महोत्सव निमित्त पहाटे ढोल वाजवून मंगल आरती तर ७:३० वाजता महायज्ञ पूजन करीत ध्वजारोहण तसेच सकाळी नऊ वाजेपासून महाप्रसादाचा भंडारा कार्यक्रम सुरू होईल. रात्री ९ वाजता लोकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा आयोजित केला आहे. तर दिनांक १७ रोजी पहाटे मंगलआरती करून व रात्री ७ वाजता सामूहिक प्रार्थना ध्यान आरती होईल. भैरवनाथअष्टमी निमित्त संपूर्ण खानदेशासह दुरवरील भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. आतापासूनच माळन नदीच्या पात्रात पाळणे, पालखे, विविध विक्रेते, खेळने विक्रेते, खाद्यपदार्थांची दुकानांची रेलचेल सुरू झाली आहे. संपूर्ण देशात असलेल्या तीन मंदिरांपैकी एक असलेल्या या मंदिरातील यात्रोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येणार असून परिसरातील नागरिकांमध्ये ही उत्साहाचे वातावरण आहे.
पाडळसरेत केसरी भैरवनाथ जयंतीनिमित्त पूजन व भंडारा…
नवीन पुनर्वसित पाडळसरे गावाच्या शिवेवर पुरातन व जागृत देवस्थान असलेल्या केसरी भैरवनाथ जयंतीनिमित्त मंदिर परिसरात रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे , दिनांक १६ रोजी केसरी भैरवनाथ मंदिरात सकाळी अभिषेक , पुजन व प्रांत आरती होऊन नवसपूर्तीचा कार्यक्रम झाल्यावर महाप्रसाद वाटप करण्यात येणार असल्याचे भैरवनाथ मंदिराचे सेवेकरी हभप हिरालाल पाटील यांनी कळविले आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर संस्थेकडून करण्यात आले आहे.







