
अमळनेर:- तालुक्यातील दोधवद येथे शेतीच्या बांधावरून एकास मारहाण केल्या प्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्या विरोधात मारवड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी जितेंद्र नत्थु करंदीकर (रा. दोधवद ह. मू. अमळनेर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक २० नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता दोधवद येथे शेतात ट्रॅक्टरद्वारे शेतीचे काम सुरू असताना शेजारील शेताचा शेतमालक विनायक राजाराम पाटील यांनी ट्रॅक्टरचालकास थांबवून काम बंद पाडले. फिर्यादीने याचा जाब विचारला असता फिर्यादीस काठीने पाठीवर, डोक्यावर मारहाण करत शिवीगाळ करून जिवंत ठेवणार नाही असे सांगत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानतंर मुका मार लागल्यामुळे वैद्यकीय उपचार घेत असल्याने तसेच मुलीची तब्येत खराब असल्याने फिर्याद देण्यात उशीर झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यावरून विनायक राजाराम पाटील यांच्यावर भादवि कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे. कॉ. संजय पाटील करीत आहेत.







