मारवड पोलीसात दोन्ही गटांनी केली तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील गलवाडे येथे जुन्या वादातून दोन गटात मारहाण व दगडफेक झाल्याची घटना घडली असून दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
पहिल्या गटातर्फे कल्पना राजू सैदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २० डिसेंबर रोजी संध्याकाळी ६:३० वाजेच्या सुमारास दुर्गाबाई न्हानु भील हीने काही कारण नसताना शिवीगाळ सुरू केली व तिचा आवाज ऐकून गणेश सुभाष मालचे, सुकदेव शेनपडू पाटील, अजय जंगलू भील, विकास न्हाणू भील, विजय रामा भील, दुर्गा भील, उषा प्रकाश भील, पंकज मालचे, संजय हिरामण भील, सायराबाई भील, सपना भील, अक्षय मालचे, करण भील, शंकर ठाकरे, रवींद्र भील, विजय भील, कैलास भील, भाऊसाहेब भील, रेखाबाई भील, हे सर्व जमा झाले. व दगडफेक करण्यास सुरुवात केली तसेच दुर्गाबाई हीने फिर्यादीच्या अंगावर मिरची पूड फेकून मंगळसूत्र ओढल्याने तुटून नुकसान झाले. तसेच इतरांनी घरातील महिलांना मारहाण करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच इतरांनी लाठ्या काठ्यानी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे वरील १९ जणांविरुद्ध मारवड पोलीसात फिर्याद देण्यात आली आहे.
दुसऱ्या गटातर्फे दुर्गाबाई भील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २० डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास पाणी भरण्यासाठी जात असताना संदीप किशोर शिरसाठ याने यांना कमी झालं आहे, अजून एकदा पाहावं लागेल असे अहिरानीत बोलला व कल्पना सैंदाणे, लता सैंदाणे यांनी शिवीगाळ करत चापटा बुक्यांनी मारहाण करत गळ्यातील सोन्याची पोत ओढून तोडून नुकसान केले. त्यावेळी संदीप शिरसाठ, शाम सैंदाणे, सोनू सैंदाणे, तेजस बच्छाव, लक्ष्मी सैंदाणे, निला सैंदाणे, अक्षय बच्छाव, किरण बच्छाव, नाना सैंदाणे यांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण करत दगडफेक केली. त्यामुळे वरील ११ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. दोन्ही घटनांचा तपास पीएसआय विनोद पाटील हे करत आहे.