अमळनेर:- जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याच्या मोहीमेत अमळनेर येथील सराईत गुन्हेगार दादू धोबी यास स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी कारवाईने सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण केला आहे.अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी अमळनेर येथील गुन्हेगारीचा आढावा घेतला. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे मार्गदर्शन घेत रेकॉर्ड वरील काही सराईत गुन्हेगार दादू धोबी उर्फ राजेश एकनाथ निकुंभ रा.जुना पारधी वाडा, सुभाष चौक,अमळनेर हा अतिशय सक्रिय असल्याचे दिसून आले. त्याच्यावर लोकांची लूटमार करणे, चाकू, सुरे तलवार घेवून लोकांमधे दहशत निर्माण करणे, न्यायालयीन कोठडीत असतांना पोलीसांच्या रखवालीतून पळून जाणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे असे विविध कायदा व कलमान्वये 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. दहशतीमुळे कोणीही साक्षीदार त्याच्याविरुद्ध न्यायालयात साक्ष देण्यास तयार होत नसे. जनसामान्यांची भावना जाणून घेत पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी त्याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक जळगाव व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मंजूर करवून त्यास नाशिक सेन्ट्रल जेल येथे स्थानबद्धतेसाठी पाठविण्यात आले आहे. स्थानबद्धता ही एक वर्ष कालावधीची असून कठोर कारवाई केल्याने अमळनेरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे व पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या टिमचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. या मोठ्या व परिणामकारक कारवाईमुळे गुन्हेगारांच्या छातीत धडकी भरली असून पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना या कामात त्यांच्या मुख्य पथकातील पोहेका किशोर पाटील, पोना दिपक माळी, पोका रविंद्र पाटील, पोहेका शरद पाटील, पोका सिद्धांत सिसोदे यांनी मदत केली आहे. तसेच पो.उ.नि. अनिल भुसारे, पोहेका प्रमोद पाटील, पोका जितेंद्र निकुंबे, पोका कमलेश बाविस्कर यांनी देखील हातभार लावला आहे.