अमळनेर तालुका पत्रकार संघ ठरला पुरस्काराचा मानकरी…
अमळनेर:- मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराची पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा करण्यात आली. यात अमळनेर तालुका व शहर पत्रकार संघास देखील पुरस्कार जाहीर झाला आहे.
लवकरच लातूर जिल्हातील चाकूर येथे होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपुत यांनी दिली. राज्याच्या विविध भागातील पत्रकार संघ वर्षभर अनेक उपक्रम राबवून, सामाजिक बांधिलकी जपत समाज जागृतीचे कार्य करीत असतात. समाजाकडून अशा पत्रकारांच्या किंवा पत्रकार संघाच्या कार्याची पाहिजे तशी दखल घेतली जात नाही. त्यामुळे देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुका संघांच्या कार्याचं कौतूक करण्याची परंपरा गेली सहा वर्षे सुरू केली आहे. जाणीवपूर्वक राज्याच्या वेगवेगळ्या भागात पुरस्कार वितरण सोहळे आयोजित करून पत्रकार संघांचा यथोचित गौरव केला जातो. 2022 चे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे होणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या तारखेची लवकरच घोषणा करण्यात येईल असे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले..
दरम्यान प्रत्येक महसूल विभागातून एक या प्रमाणे नऊ महसूल विभागातील नऊ आदर्श तालुका पत्रकार संघांचा परिषदेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव केला जातो. स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यंदाचे पुरस्कार पुढील प्रमाणे-
नागपूर विभाग : मोहाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा भंडारा, अमरावती विभाग : धामणगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा अमरावती, लातूर विभाग : औढा नागनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा हिंगोली, नाशिक विभाग : अमळनेर तालुका पत्रकार संघ, जिल्हा जळगाव, पुणे विभाग : पुरंदर तालुका पत्रकार संघ जिल्हा पुणे, कोल्हापूर विभाग : जत तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली, औरंगाबाद विभाग : पैठण तालुका पत्रकार संघ, जिल्हा औरंगाबाद, कोकण विभाग : महाड तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा रायगड.