
भक्तिमय वातावरणात रंगले ग्रामस्थ, महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय…

अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे श्री शिव महापुराण कथा सेवा समिती व ग्रामस्थांतर्फे आयोजित श्री शिव महापुराण कथेस भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय आहे.

मारवड येथील श्री विठ्ठल मंदिर चौकात १९ जानेवारी पासून श्री शिवमहापुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले असून रोज सकाळी ५:३० वाजता काकड आरती, सायंकाळी ७:३० वाजता शिव आरती व रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत शिवकथा असा दैनंदिन कार्यक्रम आहे. रात्री मारवड, गोवर्धन, बोरगाव सह परिसरातील खेड्यातून भाविक विशेषत महिलांची उपस्थिती लाभत आहे. श्रीकृष्ण कृपामुर्ती भागवताचार्य श्री हभप वामनजी महाराज (लामकानी) यांच्या अमृत वाणीतून सर्व भाविक भक्तांनी शिवकथा श्रवणाचा लाभ घेत आहेत. सजीव देखावे व आरास याचा प्रभावी वापर करून संगीतमय शिवकथेस भाविकांची मोठी उपस्थिती लाभत आहे. माजी सैनिक विनोद बोरसे, यांच्यासह मारवड येथील शहीद जवान कै. विजय साहेबराव साळुंखे यांच्या मातोश्री यांचा सत्कार भागवताचार्य श्री हभप वामनजी महाराज यांच्याहस्ते करण्यात आला. सदर शिवपुराण कथेस सात्री येथील माजी सरपंच महेंद्र बोरसे, पं.स. उपसभापती भिकेश पाटील, मुडी येथील हर्षल पाटील, मारवड सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी भेट घेत आशीर्वाद घेतले. दिनांक २६ गुरुवार रोजी काल्याचे कीर्तन असून सकाळी ११ पासून महाप्रसादास सुरूवात होणार आहे.







