नाट्यगृहात संवाद मेळावा व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न…
अमळनेर:- लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनता एकत्र आल्यास क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही,मी माझं आणि आमचं यातच आम्ही अडकून पडलो आहे,तसे न करता शासकीय सेवेतील मंडळींनी त्याग, सत्य आणि सेवा या त्रिसूत्रीचा अवलंब करून भ्रमात न जगता वास्तविकता स्वीकारा असा मौलिक सल्ला जळगाव येथील नोबेल फाऊंडेशन चे प्रा जयदीप पाटील यांनी दिला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात देशभक्तीपर गीतांचे तसेच संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यासाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना व शिक्षक वृंदाना निमंत्रित करण्यात आले होते. आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.सुरवातीला अमळनेर येथील प्रसिद्ध कलाकार श्याम संदानशीव आणि ग्रुपने एकापेक्षा एक देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असतांना “काय कमावलं काय गमावलं”, तसेच “शासकीय सेवेतली पहिला टप्पा” व “सेवानिवृत्ती नंतरचा दुसरा टप्पा” या विषयांवर नोबेल फाउंडेशन चे जयदीप पाटील यांच्या व्याख्यानाला प्रारंभ झाला. तत्पूर्वी प्रास्तविक संदीप घोरपडे तर माजी आमदार दिलीपराव सोनवणे, मुंबई येथील राजकीय पत्रकार दीपक भातुसे,प्रा अशोक पवार,बन्सीलाल भागवत यांनी मनोगत व्यक्त केले.
सरकारी खुर्चीवर आईसारखे प्रेम करा..
प्रा जयदीप पाटील व्याख्यानात म्हणाले की, आपल्या देशाची मानस चांगली म्हणून येथे माणुसकी आहे आणि म्हणून आपला देश चांगला आहे,खरेतर हीच आपली कमाई आहे,विज्ञान व शिक्षण याकडे दुर्लक्ष करू नका आज 104 सॅटेलाईट आपण एकाचवेळी अवकाशात सोडतो ही 75 वर्षातील कमाई आहे, भारत व्यक्ती निर्माण करण्यात मोठा देश पण रत्न निर्माण करण्यात कमी पडतो,75 वर्षात थोडं मागे वळूनही बघावे लागेल, आज आपण भ्रमात जगतो आहे, ही वास्तवविकता स्वीकारली पाहिजे, सण पहिल्या सारखे राहिले नाहीत असे म्हटल्यावर आपण काय कमावलं असा प्रश्न पडतो, सुंदर पिचाई भारताचे पण त्यांच्या ब्रेनवर चालणारे गुगल भारताचे नाही हे दुर्देव आहे,जो सरकारी कर्मचारी खुर्चीवर आई सारखे प्रेम करतो त्याचे नाव अमर राहते, शासकीय काम आणि 12 महिने थांब हे खोडून काढा, कर्तव्य म्हणून काम करा,त्याग,सत्य,सेवा या तीन गोष्टी कृष्णाने सांगितल्या आहेत, कर्म महात्म्य हीच आपली संस्कृती आहे,सुस्त, त्रस्त, व्यस्त, मस्त असे चार प्रकारचे लोक सरकारी कार्यालयात दिसतात, यातील मस्त गट सर्वात उत्तम आणि आनंदी असतो. अधिकारी कर्मचारी ना बदली ही देणंच आहे, आपल्या कर्मातून प्रत्येक गाव आपलंसं करा,जे सानेगुरुजीनी अमळनेर येथे केलं,सत्य आपल्यात रुजलं तर आपोआप सेवा घडते,शिस्त माणसाला समाधान आणि खूप आनंद देते,नोकरी करताना शिस्तीत,सत्याच्या बाजूने राहणे आवश्यक आहे,ज्ञान मिळविण्यासाठी तथा आपले विश्व निर्माण करण्यासाठी अभ्यास करा,मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थी असला पाहिजे, शासकीय लायब्ररी वाचली पाहिजेत, पप्पा तुम्हाला तर काहीच माहीत नाही असे मुलं बोलत असतील तर दुर्देव आहे. म्हणून तुम्हीही अपडेट राहा, इतरांच्या डोळ्यात पाणी येईल असे जगून दाखवा,निवृत्ती ला इतरांच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे,निवृत्ती नंतर उत्तरायण झाले पाहिजे,वृद्धत्व शरीराची अवस्था आहे,मनाची नाही,एका क्षेत्रातून निवृत्त झाले म्हणजे तुम्ही अकार्यक्षम होत नाही.निवृत्ती नंतर देवाच्या आश्रयास जातात म्हणजे स्वतःला कमकुवत करतात असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.अधून मधून हास्याचे फवारे उडवत त्यांनी ही मेजवानी दिल्याने व्याख्यान एकूण सारेच भारावले होते.
बौद्धिक खाद्य देण्यासाठी हा उपक्रम-आ.अनिल पाटील
अध्यक्षीय मनोगतात आमदार अनिल पाटील यांनी कर्मचारी वृंदाना बौद्धिक खाद्य देण्यासाठी हा उपक्रम आम्ही घेतला असून, आज प्रजासत्ताक दिनी याची सुरुवात झाली आहे, टप्प्याटप्प्याने असे कार्यक्रम घेऊन मतदारसंघातील सर्व घटकापर्यंत हे बौद्धिक खाद्य पोहोचविणार असल्याचा माणस आमदारांनी व्यक्त केला.
सूत्रसंचालन सौ वसुंधरा लांडगे तर आभार राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष हर्षल पाटील यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे आयोजन जि.प. सदस्या जयश्री अनिल पाटील यांनी केले होते,सदर आयोजनाबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले.यावेळी मंचावर जेष्ठ नेत्या सौ तिलोत्तमा पाटील, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, मारवडचे सहा पोलीस निरीक्षक जयेश खलाने, गटशिक्षण अधिकारी विश्वास पाटील, खा.शी संचालक डॉ.अनिल शिंदे, काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, शहराध्यक्ष काँग्रेस मनोज पाटील, शहराध्यक्ष राष्ट्रवादी मुक्तार खाटीक, मुख्याध्यापक प्रकाश भिका पाटील, तुषार पाटील, प्रा आर एम पारधी, सुरज परदेशी,न प कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी सोमचंद संदानशीव, शिक्षक भरती जिल्हा कार्याध्यक्ष आर.जे.पाटील सर, नगरसेवक दीपक पाटील, प्रा. आय.एस.पाटील, प्रा मंदाकिनी भामरे, योजना पाटील, अलका पवार, ॲड.तिलोत्तमा पाटील, प्रा.नलिनी पाटील, रिटा बाविस्कर, रंजना देशमुख, आशा चावरिया, कविता पवार, नूतन पाटील, गौरव पाटील, राष्ट्रवादी शिक्षक शहर अध्यक्ष कैलास पाटील, सचिन साळुंखे, सुरेखा पाटील, बाळू पाटील, यतीन पवार, निलेश देशमुख यासह सर्व कर्मचारी व शिक्षक संघटनाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.