मुख्यमंत्र्यांना ५१ हजार पत्र लिहून ही हाती पुन्हा धतुरा…
अमळनेर:- यंदाच्या अर्थसंकल्पात अमळनेरकरांच्या पदरी पुन्हा निराशा आली असून पाडळसरे धरणासाठी १०० कोटींचा तुटपुंजा निधी देवून सरकारने पुन्हा जनतेच्या हाती पुन्हा धतुरा दिला आहे.
निम्न तापी पाडळसरे प्रकल्पाची किंमत ५१४१.६९ कोटींवर पोहोचली असून आतापर्यंत ६०२.१० कोटी खर्च झाले आहेत. मागील वर्षी १३५ कोटी मंजूर झाले होते तर यंदा १०० कोटींवर बोळवण करण्यात आली आहे. या १०० कोटीतून ही ७० ते ७५ टक्के रक्कम भोकर येथील पुलासाठी व उर्वरित अधिकाऱ्यांच्या पगारासाठी खर्ची पडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या निधीत धरणाचे एक इंच काम होते की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. अमळनेर तालुक्यात १६ कोटीची एक उपसा सिंचन पूर्ण होत नसून जिल्ह्यातीलच मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भागातील उपसा सिंचन योजनांसाठी २१० कोटींचा निधी खेचून आणला आहे. त्यामुळे अमळनेरकरांना निधी पासून वंचित ठेवण्याचा प्रत्येक सरकारचा डाव आहे हे स्पष्ट होत आहे. मागील महिन्यातच जनआंदोलन समितीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ५१ हजार पत्र लिहिण्याचे आंदोलन केले होते. मात्र त्या आंदोलनाने शासनाला जाग आली नसून तालुक्याला सापत्नपणाची वागणूक देण्याचे आजतागायत सुरू आहे. धरणाची कपाळाला माती लावून निवडून येणारे खासदार सध्या सामान्य अमळनेरकरांपासून तोंड लपवत फिरत असून दिलेल्या शब्दाला जागले नसल्याने असा प्रसंग त्यांच्यावर आल्याचे दिसून येते आहे. आजी माजी लोकप्रतिनिधी ही याबाबत मूग गिळून गप्प आहेत. निवडणुकांसाठीच त्यांचे तोंड उघडेल मात्र जनतेनेच त्यांना याबाबत जाब विचारणे गरजेचे आहे. आपल्या हक्काचे पाणी तालुक्याच्या सीमेवरून वाहून जात असताना तालुक्यातील शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याकडून काही होत नाही याची लाज नेत्यांना नसून एकंदरीत एक पिढी खपली त्यानतंर दुसरी खपेल पण धरण काही पूर्ण व्हायचे नाही हेच सद्यस्थिती आहे.
प्रतिक्रिया
निम्न्न तापी प्रकल्पाची म्हणजेच खान्देशच्या जनतेची अर्थसंकल्पाने पुन्हा घोर निराशा केली आहे.धरणाच्या लाभक्षेत्रातील ६ पैकी ३ मतदारसंघात मुख्यमंत्री यांचे पक्षाचे आमदार आहेत तर एका मतदार संघात उपमुख्यमंत्री यांचे पक्षाचे आमदार,व २ खासदार आहेत अश्या स्थितीत हजारो कोटींच्या प्रकल्पासाठी १०० कोटी रक्कम सत्ताधारी पक्षाच्या आणि जनतेच्या दृष्टीने समाधानकारक नाही. खान्देशच्या जनतेसाठी निम्न तापी प्रकल्पाचे महत्व राज्य सरकारने अजूनही गांभीर्याने घेतलेले नाही. जिल्ह्यातील मंत्री महोदय यांचेकडून खूप अपेक्षा होत्या. राज्यशासनाने जनआंदोलन समितीच्या मागणीनुसार सदर प्रकल्प केंद्र सरकार कडे वर्ग करावा यासाठी आम्ही आशावादी आहोत तरच पाडळसरे धरण पूर्ण होईल अन्यथा भविष्यात जनआंदोलन समिती व राज्यकर्ते यांचा संघर्ष अटळ आहे.
:- सुभाष चौधरी
पाडळसरे धरण जन आंदोलन समिती
प्रतिक्रिया:-
विदर्भातील गोसेखुर्द प्रकल्पाला १५०० कोटी देतांना खान्देशच्या निम्न्न तापी प्रकल्पाला यंदा जाहीर झालेला १०० कोटी निधी अत्यल्प आहे. आधीच मागील २ वर्षात जाहीर झालेला निधीच्या तुलनेत प्रशासनाने केलेला खर्च अत्यंत तोकडा व निराशाजनक व संतापजनक आहे. केंद्र सरकारच्या निधीशिवाय निम्न तापी प्रकल्प पूर्ण होणे शक्य नाही. यासाठी जनआंदोलन समितीने जनतेची हजारो पत्र पाठवून ‘पाडळसरेचा केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी संजीवनी योजनेत समावेश करावा’ ही मागणी राज्यशासनाने तातडीने पूर्ण करावी आणि खान्देशवासीयांना न्याय द्यावा.
:- रणजित शिंदे, पाडळसरे धरण जन आंदोलन समिती