
२० वर्षीय विवाहितेने दिली सासरच्या मंडळींविरुद्ध फिर्याद…
अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथील माहेर असलेल्या २० वर्षीय विवाहितेने छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध मारवड पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निंभोरा येथील गायत्री कोळी हिचे लग्न चोपडा येथील अजय कोळी याच्याशी फेब्रुवारी २०२२ मध्ये झाले होते. लग्नाच्या दोन महिन्यानंतर लग्नात ऐपतीप्रमाणे हुंडा दिला नाही म्हणून तसेच घर बांधण्यासाठी माहेरून पन्नास हजार रुपये आणावेत म्हणून शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. व ऑक्टोबर २०२२ महिन्यात विवाहितेला माहेरी सोडण्यास आले असता वडिलांशी वाद घातला. त्यावेळी विवाहितेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिला मारहाण केली. त्यानंतर तिला नेण्यास आले नाहीत म्हणून प्रतिष्ठित लोकांमार्फत व कौटुंबिक कल्याण केंद्र यांच्यामार्फत समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा उपयोग न झाल्याने विवाहितेने मारवड पोलीसात पती, सासू, सासरे, नणंद यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून कलम ४९८ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे. कॉ. संजय पाटील हे करीत आहेत.







