
दोनजण जखमी, आयशर चालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील पाडसे गावाजवळ एका चारचाकी वाहनास आयशरने धडक दिल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना दिनांक १४ रोजी दुपारी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महावितरणचे काम घेणारे खाजगी कॉन्ट्रॅक्टर तेजस अग्रवाल (रा. जळगाव) हे त्यांच्या कामानिमित्त सुपरवायझर प्रदीप सावकारे यांच्यासोबत होंडा सिटी गाडीने नरडाणा येथे जात असताना अमळनेर ते बेटावद रोडवर पाडसे गावाच्या पुढे समोरून येणाऱ्या एमएच १९ सीवाय ७५०७ क्रमांकाच्या आयशरने जोरदार धडक दिल्याने गाडी पूर्ण गोल फिरून ड्रायव्हर कडील भाग पूर्ण दाबला जावून तेजस अग्रवाल व प्रदीप सावकारे हे जखमी झाले. एअरबॅग उघडल्याने अधिकची दुखापत टळली. त्यावेळी आयशरचा ड्रायव्हर अनिल रामराव शिरसाठ (रा. भोरखेडा ता. चाळीसगाव) हा पळून गेला होता मात्र ग्रामस्थांनी त्यास पकडुन आणले. सदर ड्रायव्हरच्या चुकीमुळे गाडीचे नुकसान व दोघे जखमी झाल्याने तेजस अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून अनिल शिरसाठ याच्याविरुद्ध भादवि कलम २७९, ३३७, ३३८, मो.व्हे. अँक्ट १८४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एएसआय किशोर पाटील हे करीत आहेत.







