अफवा पसरून दुकाने पटापट बंद झाल्याने बाजारपेठेत नागरिकांची पळापळ…
अमळनेर:- शहरातील दंगलीतील आरोपी अशपाक उर्फ पक्या सलीम शेख याचा मृत्यू झाल्याने शहरात सायंकाळी दुकाने पटापट बंद झाल्याने नागरिकांची पळापळ सुरू झाली. मात्र पोलिस यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्याने तणावपूर्ण शांतता होती.
शहरात ९ रोजी रात्री किरकोळ कारणावरून जिनगर गल्ली, सराफ बाजार,सुभाष चौक भागात दगडफेक झाली होती त्यात सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. रात्रीच पोलिसांनी २९ आरोपीना अटक केली होती. १३ आरोपीना १४ पर्यंत पोलीस कोठडी आणि १८ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पोलीस कस्टडीत असलेला माजी नगरसेवक सलीम शेख उर्फ टोपी यांचा मुलगा अशपाक उर्फ पक्या सलीम शेख हा १२ रोजी रात्री कस्टडीत विचित्र वागू लागला व विचित्र आरोळ्या मारत होता. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला ताबडतोब जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तिथे ९ नंबरच्या कक्षात उपचार झाल्यानंतर त्याला अत्यवस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला अतिदक्षता विभागात बुधवारी १४ रोजी हलवण्यात आले होते. बुधवारी दुपारी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र त्याची तब्येत खालवल्यानंतर उपचारादरम्यान संध्याकाळी ७ वाजता अशपाक उर्फ पक्या याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्याच्या मृत्यूची खबर अमळनेर शहरात पोहचताच सराफ बाजार व सुभाष चौक परिसरातील दुकाने पटापट बंद झाली. दुकाने बंद होताच नागरिकांनी धावाधाव सुरू केली. वेगाने मोटरसायकली,रिक्षा घराकडे जाऊ लागल्या होत्या. त्यामुळे दगडफेक झाल्याची अफवा पसरली होती. मात्र डीवायएसपी सुनील नंदवाळकर, मारवड पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, एपीआय राकेशसिंग परदेशी व इतर अधिकारी कर्मचारी यांनी दगडी दरवाजा, सराफ बाजार,कसाली मोहल्ला, इस्लामपूरा ,सराफ बाजार, पानखिडकी भागात ध्वनिक्षेपकाद्वारे शांततेचे आवाहन केले. अफवांवर विश्वास ठेवू नका म्हणून संदेश दिले. आमदार अनिल पाटील, पत्रकार संघटनेने देखील तातडीने सोशल मीडियावर कोणताच अनुचित प्रकार घडला नाही, नागरिकांनी शांतता ठेवण्याचे आवाहन केल्याने नागरिकांची भीती दूर होऊन सुटकेचा श्वास सोडला. शहरातील संवेदनशील व महत्वाच्या भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.