भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला आरोप…
अमळनेर:- महाविकास आघाडीच्या काळात निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणास लागणाऱ्या विविध मान्यता वेळेवर न दिल्याने १५०० कोटी रुपयांचा निधी मिळू शकला नाही आणि त्यामुळेच प्रकल्प रखडला व त्याची किंमत ५५०० कोटींपर्यंत गेल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार स्मिता वाघ यांनी काल पत्रकार परिषदेत केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारला नऊ वर्ष झाल्याबद्दल या काळातील कामांचा आढावा व विकास जनतेसमोर मांडण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. यासाठी भाजपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्मिता वाघ बोलत होत्या. भाजप योजना आखून विकासकामांना उजाळणी देत असून २१ रोजी सामूहिक योगा प्रशिक्षण आणि २६ रोजी माजी खासदार सरोज पांडे यांच्या उपस्थितीत भाजप युवा मोर्चाची बाईक रॅली आयोजित केली आहे अशी माहितीही स्मिता वाघ यांनी दिली. २६ रोजी भाजपच्या विविध आघाड्या ,मोर्चा व समित्यांचे संमेलन अमळनेरात आयोजन करण्यात आले आहे. तर २३ रोजी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध बुथवर कॉन्फरन्सिंग आयोजित केले आहे. जेष्ठांचे संमेलन, व्यापारी मेळावा , लाभार्थी संमेलन, प्रभावशाली व्यक्ती भेटी आदी प्रकारचे मायक्रो नियोजन भाजपने केले असल्याचेही सांगण्यात आले. जळगाव मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांचे अमळनेर तालुक्याकडे दुर्लक्ष असून ते इकडे चमकत नाहीत असा जनतेचा आरोप आहे असा प्रश्न विचारला असता यावर बोलताना वाघ यांनी सांगितले की, लवकरच खासदार तालुक्यात भेटी घेतील त्यांची काही कामे देखील होणार आहेत त्या कामाचे उदघाटन करण्यासाठी येतील असा खुलासा केला. पत्रकार परिषदेस भाजप युवा मोर्चाच्या भैरवी वाघ-पलांडे, माजी सभापती श्याम अहिरे,तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, युवा मोर्चाचे राकेश पाटील,बाजार समिती संचालक शरद पाटील, माजी अध्यक्ष शीतल देशमुख, जिजाबराव पाटील, राहुल पाटील, विजय राजपूत, शिवाजी राजपूत आदी हजर होते.