
तालुक्यातील गांधली येथील घटना, ग्रामस्थांनी केली मोठ्या प्रमाणावर गर्दी…
अमळनेर:- तालुक्यातील गांधली येथे पिण्याच्या पाईपलाईन साठी खोदकाम करतांना पुरातन काळातील भांडी सापडली आहेत. गांधली हे गाव पूर्वीची मोठी बाजारपेठ होती व येथे भुईकोट किल्ला होता. त्यामुळे ही भांडी संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहेत.
गांधली येथे पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. बौद्ध वाड्यात जेसीबी मशीनने पाईपलाईन खोदण्याचे काम सुरू असताना अचानक भांड्यांचा आवाज आला. खोदकामात काही भांडी तुटली. आज खोदकाम करताना वेगवेगळ्या आकाराची भांडी आढळून आली आहेत. माजी सरपंच सुनील पाटील यांनी ही भांडी एका पोत्यात भरून ठेवली आहेत. सरपंच नरेंद्र पाटील यांनी तूर्त खोदकाम थांबवून ठेवले आहे.
गांधली गावाचा इतिहास जुना असून छत्रपती शिवाजी महराजांनी सुरतेवर आक्रमण केले तेव्हा त्यांनी दोन टोळ्या बनवल्या होत्या. धरणगाव येथे थांबल्यानंतर त्यांनी एक टोळी बऱ्हाणपूर दिशेने जात आहे असे दर्शवले होते. धरणगावनंतर गांधली येथे महाराज थांबले होते. याठिकाणी भुईकोट किल्ला होता. गावाला साडे चार किमीची तटबंदी होती. आजही तुटलेल्या अवस्थेत दोन दरवाजे, शिल्लक असलेली दोनशे मीटर तटबंदी हे किल्ल्याचे अस्तित्व दर्शवतात. सुरतचे नाके म्हणून हे गाव ओळखले जात होते. येथील व्यापाऱ्यांचा थेट सुरतशी संपर्क होता. मात्र उत्तर पेशवाईच्या काळात तत्कालीन पेंढारी जमातीने गावावर दोनदा हल्ले करून लूटमार करून नेल्याने गाव उध्वस्त झाले होते. येथील व्यापारी पळून गेले होते. आजही अनेकदा खोदकाम करताना या ठिकाणी २०-२० फुटाचे पेव आढळून येतात.
गांधली येथे पुरातन काळातील भांडी आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनला कळवण्यात येईल. याबाबत जिल्हा प्रशासन योग्य निर्णय घेईल.
:- तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, अमळनेर








