उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर यांची उपस्थिती…
अमळनेर:- कृषी विभागातर्फे दिनांक २५ जून ते १ जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून काल सप्ताहाच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथे करण्यात आले.
उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर यांची याप्रसंगी उपस्थिती होती. ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून योग्य रीतीने नियोजन केल्यास शेती करणे सोपे जाईल. माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर, पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी निंबोळी अर्क व दशपर्णी अर्कचा वापर करावा तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे तसेच सदरील सप्ताहामध्ये विविध पिकांचे बाबतीत जे मार्गदर्शन करण्यात येत आहे त्याचा लाभ शेतकरी बंधूंनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी कृषी अधिकारी सोनाली सोनवणे यांनी नैसर्गिक शेतीबाबत सखोल मार्गदर्शन करत बीज प्रक्रियेचे महत्त्व सांगितले. मंडळ कृषी अधिकारी प्रविण पाटील यांनी एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास प्रकल्प, महाडीबीटी वरील योजना तसेच रासायनिक खते व सूक्ष्म मूलद्रव्य याबाबत माहिती सांगितली. कृषी पीक तंत्रज्ञान बाबत सखोल मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी यांनी यावेळी पीएमएफएमइ योजनेबाबत माहिती सांगितली व कृषी योजनाबद्दल माहिती दिली. तसेच बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवत त्याचे फायदे सांगितले. सदरील गावांमध्ये हा सप्ताह कशाप्रकारे राबविला जाणार आहे याची माहिती कृषी सहाय्यक मालू बेडसे यांनी दिली तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकल्पातील शेतकऱ्यांना बाजरी बियाण्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी रमेश दत्तू पाटील, सदाशिव यादव बडगुजर, यांच्यासह संतोष पाटील, दिलबर पाटील, प्रवीण पाटील, मोतीलाल पाटील, नंदलाल पाटील, संतोष पाटील, भानुदास पाटील, कैलास बडगुजर, युवराज पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश वंजारी तर आभार प्रदर्शन श्रीमती मालू बेडसे यांनी केले. कृषी विभागामार्फत काल तालुक्यात हिंगोणे, गलवाडे, डांगरी, दहिवद, लोण, जळोद, लोंढवे, सडावण, आदी गावात देखील कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त कार्यक्रम राबविण्यात आला.