अमळनेर:- तालुक्यातील कलाली येथे १७ वर्षीय तरुणीने काल पहाटे ७:३० वाजेच्या सुमारास राहत्या घरात वरच्या मजल्यावर गळफास घेत जीवनयात्रा संपविली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कलाली येथे ज्ञानेश्वर सुकदेव कोळी हे आपल्या कुटुंबासह राहत असून किराणा दुकान चालवून आपला उदरनिर्वाह चालवत असून त्यांची मुलगी लक्ष्मी ही नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. दिनांक २६ रोजी सकाळी ७:३० वाजता लक्ष्मी हिने राहत्या घरी वरच्या मजल्यावर गळफास लावून घेतल्याचे लक्षात आल्याने नातेवाईकांनी तिला खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दहावीनंतर अकरावीला अमळनेर येथे प्रवेश घ्यावा असा लक्ष्मीचा आग्रह होता, मात्र आईवडिलांनी अमळगाव येथे प्रवेश घे असे सांगितल्याने ती नाराज होती अशी माहिती मिळाली असुन या दुःखद घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील करीत आहेत.