काळे कपडे, दुखवटा परिधान करीत प्रशासनाला दिली कवड्यांची माळ…
सकाळी निवेदन देताच दुपारी ४.५ कोटींच्या रस्त्याला तत्वत मान्यता…
अमळनेर:- रोजच जिवन मरणाशी दोन हात करणार्या सात्री ग्रामस्थांची व्यथा आंदोलने करूनही सुटत नसल्याने अखेर शासन आपल्या दारी योजनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध करीत काळे कपडे आणि काळा दुखवटा परिधान करीत माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी सोमवारी प्रशासनाला कवड्यांची माळ आणि निवेदन दिले. या अनोखा आंदोलनाने प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. या निवेदनाची रिएक्शन म्हणून रस्त्याला तत्वत मान्यता मिळाल्याचे पत्र बोरसे यांना तापी महामंडळातर्फे दुपारी देण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्याच्या पूर्वसंध्येला महेंद्र बोरसे यांनी आंदोलन केल्याने प्रशासनात चांगलेच खळबळ उडाली. प्रांताधिकारी कार्यालय आणि आपली पाटबंधारे कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांनी हे अनोखे आंदोलन केले त्यामुळे मुख्यमंत्री दौऱ्यावर येण्याआधीच हे आंदोलन झाल्याने प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकले आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोरही महेंद्र बोरसे हे आंदोलन करणार असल्याने त्यांचे आंदोलन होऊ न देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले गेले. मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात पुर परिस्थितीत दगावलेल्या व्यक्तींच्या प्रतिमा व कवडयांची माळ त्याचबरोबर काळे झेंडे भेट देऊन मुख्यमंत्र्यासह प्रशासनाचा निषेध व्यक्त करावयाचा असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले व या बाबतीत होणाऱ्या परिणामास संबंधित विभागातील अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा महेंद्र शालीग्राम बोरसे यांनी निवेदनाद्वारे दिला होता. त्यामुळे सात्री येथील पर्यायी रस्त्याला अखेर तापी महामंडळाचे कार्यकारी अभियंता पवार यांनी तत्त्वता मान्यता दिली आहे. दुपारून तातडीने मंजुरी देण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासूनपासून सात्री गावाला रस्ता नसल्याने प्रमोद बोरसे, आरुषी भिल व उषाबाई भिल यांचा मृत्यू झाला होता. तरी प्रशासनाने दखल घेतली नाही म्हणून सात्री ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व अधीक्षक अभियंता पाटबंधारे यांच्या कार्यालयात आरुषी व उषाबाई यांच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढली होती. त्यानंतरही प्रशासनामार्फत अनेक त्रुटी काढल्या जात होत्या. दरवर्षी येरे माझ्या मागल्या प्रमाणे सात्री करांच्या तोंडाला पाने पुसली जात होती. म्हणून २६ रोजी सकाळी महेंद्र बोरसे यांनी काळे कपडे, डोक्यावर काळे फडके घालून उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर याना कवड्यांची माळ भेट दिली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगाव दौऱ्यात काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा दिला होता. याची तातडीने दखल घेत तापी महामंडळाचे कार्यकारी अभियंता पवार यांनी अधीक्षक अभियंता याना पत्र देऊन निम्न तापी प्रकल्पाच्या तृतीय सुधारित मान्यतेनुसार बुडीत क्षेत्राच्या रस्त्यांसाठी उपलब्ध निधीतून ४ कोटी ५६ लाख ६२ हजार ९८१ रुपये किमतीच्या पर्यायी रस्त्यास तत्त्वता मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पुढील प्रशासकीय बाबी पूर्ण होवून प्रत्यक्ष कामाला लवकर सुरुवात व्हावी अशी अपेक्षा बोरसे यांनी व्यक्त केली आहे.