मिळेल ते काम करत शिक्षण पूर्ण करून यशप्राप्त करणाऱ्या साळुंखे बंधूंचे सर्वत्र कौतुक…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील राजेंद्र सुभाषराव साळुंखे यांची फ्रान्स येथील संशोधन सेमिनारसाठी मार्गदर्शक म्हणून निवड झाली असून खडतर परिस्थितीत यश प्राप्त करणाऱ्या राजेंद्रसह त्यांचे मोठे बंधू गोविंदराव साळुंखे यांचे ही अभिनंदन केले जात आहे.
मूळचे मारवड येथील राजेंद्र सुभाषराव साळुंखे हे कुटुंबासह पुणे येथे नोकरीनिमित्त स्थायिक झाले असून सध्या पुण्यातील सुप्रसिद्ध मिशेलिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत सिनियर मॅनेजर अँड इंटरप्रायझेस आर्किटेक्ट या मानाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यांची फ्रान्स मधील पॅरिस शहरात जागतिक स्तरावर संपन्न होत असलेल्या मशीन लर्निग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च या विषयावर संपन्न होत असलेल्या संशोधनपर चर्चासत्रासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड झाली आहे.सदरील सेमिनारच्या माध्यमातून विविध देशांतील प्रस्तुत क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवर तज्ज्ञांसमोर ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मशीन लर्निग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च या संशोधनपर विषयावर ते आपले विचार व्यक्त करणार असून यामुळे प्रभावीपणे व कौशल्यपूर्ण पद्धतीने स्वतःला अभिव्यक्त करण्याची एक फार मोठी संधी त्यांना उपलब्ध झालेली आहे. त्याबद्दल त्यांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले असून ते पॅरिस साठी काल २६ रोजी रवाना झाले आहेत.
अत्यंत मेहनती असलेल्या राजेंद्र यास बालपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेली असून आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वयंसिद्ध होत त्यांनी आपल्या आवडीच्या या क्षेत्रात मोठा नावलौकिक प्राप्त केला. त्यांचे वडील स्व.सुभाषराव माधवराव साळुंखे यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतांना त्यांनी मिळेल ती कामे करुन मोलमजूरी करत शिक्षण पूर्ण करत स्वतःला स्वयंसिद्ध केले. आज ते मारवड परिसरातील तरुणांचे आदर्श ठरले आहेत. त्यांनी गावपरिसरातील तरुणांसमोर आदर्श ठेवत सातासमुद्रापार आपल्या कीर्तीचा झेंडा दिमाखाने रोवला आहे. राजेंद्र याच्या यशात त्याचे थोरले बंधू व भारतीय सैन्यदलातील निवृत्त अधिकारी, सध्या उद्योजक असलेले गोविंदराव साळुंखे मोठे योगदान राहिलेले आहे. आई वडीलांचा आशीर्वाद व वहिनी, पत्नी यांचे त्यांना सहकार्य लाभले असून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मारवडच्या सुपुत्राचे पंचक्रोशीतून सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.