
अनेक तास विद्यार्थी बसस्थानकावर ताटकळत राहिले उभे…
अमळनेर : शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जळगावला एसटीने जादा बसेस सोडल्याने शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. काही तास विद्यार्थी बसस्थानकावर ताटकळत उभे होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यासाठी विविध क्षेत्रातील लाभार्थ्यांना जळगाव आणण्यासाठी आदेश सुटले होते. आणि अधिकारी, पदाधिकारी यांना बस भरून आणण्यासाठी सक्ती करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे अमळनेर तालुक्यातून देखील २५ एस टी बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे अमळनेर आगारातील बस फेऱ्यांवर परिणाम झाले. आगारात ७० बस असून २५ जळगाव दौऱ्यासाठी पाठवण्यात आल्या होत्या. त्यात काही नादुरुस्त असल्याने आणखीच अडचण वाढली होती. ग्रामीण भागातून अनेक विदयार्थी शाळेत, महाविद्यालयात अमळनेर ला येत असतात. परंतु सकाळी काही ठिकाणी एस टी पोहचलीच नाही. आणि काही ठिकाणी उशिरा एस टी पोहचल्याने मुले मुली शाळेत जाऊ शकले नाहीत. काहींना उशिरा बस मिळाली. सर्वत्र हीच अडचण आल्याने मुलांमध्ये एसटीचा संप असल्याची अफवा पसरली होती. दुपारून मुले मुली घरी पोहचली नाहीत म्हणून पालकांना चिंता वाटत होती. काही पालक आपल्या पाल्यांना शोधण्यासाठी अमळनेर येथे आले होते.
प्रतिक्रिया….
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी २५ जादा बसेस सोडल्या आहेत,काही बसेस नादुरुस्त होत्या,त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. काही विद्यार्थ्यांना उशीर झाला मात्र सर्व ग्रामीण भागात बस सोडल्या होत्या.
:- इम्रान खान पठाण, आगार व्यवस्थापक, अमळनेर
प्रतिक्रिया….
शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या नावाखाली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यासाठी जबरदस्ती, धमक्या देत बसेस पाठवून विदयार्थी आणि शेतकरी यांचे मात्र हाल करण्यात आले ही निषेधार्ह बाब आहे.
:- अनिल भाईदास पाटील, आमदार, अमळनेर








