अमळनेर पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल…
अमळनेर:-तालुक्यातील रुंधाटी येथे शेतीच्या वादातून चुलत भावांमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली असून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी अमळनेर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील रुंधाटी येथील फिर्यादी संजय दगडू पवार यांचे वडील दगडू पवार हे शेतात असतांना बांधाच्या वादातून राजेंद्र पवार, भाऊसाहेब पवार, राहुल पवार यांनी शिवीगाळ तसेच राहुल याने छातीत बुक्का मारल्याचे त्यांनी घरी आल्यावर त्यांनी सांगितले.
वडिलांना मारहाण झाल्याचे माहीत झाल्यानंतर संजय पवार हे शेताकडून येत असतांना वरील तिन्ही संशयितांनी संजय पवार यांना देखील शिवीगाळ तसेच लाकडी दांडक्याने डोक्यावर तसेच शरीरावर मारहाण केली. तसेच हात, पाय तोडून टाकू अशी धमकी दिली.घटनास्थळी असलेल्या ग्रामस्थांच्या मदतीने संजय पवार यांना पातोंडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. संशयितांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.