भुयारी गटारींच्या नित्कृष्ट कामामुळे शहरातील रस्त्यांचा सत्यानाश….
अमळनेर:- अवघ्या दीड महिन्यात डांबरी रस्त्यावर खड्डे पडून वाहने फसत आहेत. तर रस्ता डागडुजीसाठी माती व कचरा टाकला जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. भुयारी गटारींमुळे शहरातील रस्त्यांचा सत्यानाश होत असल्याने कंत्रादारांकडून रस्ते दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
सुभाष चौक ते रेल्वे स्टेशन हा नगरपालिकेसमोरील रस्ता दीड महिन्यापूर्वीच डांबरीकरण करण्यात आला आहे. त्यापूर्वी या रस्त्यावर भुयारी गटारीचे काम करण्यात आले होते. मात्र ठरल्याप्रमाणे भुयारी गटारीच्या ठेकेदाराने खोदलेल्या चाऱ्या व्यवस्थित दाबल्या नाहीत तसेच त्यावर पूर्वीप्रमाणे रस्ता केला नाही. रस्त्याची दुर्दशा झाली असल्याने नपाने तो भुयारी गटारीच्या ठेकेदाराकडून न करता पालिकेच्या खर्चातून डांबरीकरण केला. ट्रॅक्टर व इतर वाहनांनी गटारीच्या चारीच्या जागेवरील डांबरी रस्ता खचल्याने वाहने फसत आहेत. तर खड्डे पडल्याने किरकोळ अपघात देखील होत आहेत. रस्ता वाहतुकीच्या लायक राहिलेला नाही. तसेच खड्डयात कचऱ्यासह माती टाकण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.