अमळनेर:- तालुक्यातील रढावन येथील एका इसमाचा विहिरीत बुडून तर शहरातील चोपडा रोड भागातील दुसऱ्याचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची घटना काल उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन अंबादास मराठे (वय ४२, रा मुसळी ता धरणगाव, ह.मु. रढावण राजोरे) हा आपला भाऊ शरद मराठे, आई सोबत १९ जुलै रोजी शेतात काम करत होता. दुपारी अडीच वाजेला भाऊ घरी जायला निघाला असता नितीनने मी नंतर येतो असे सांगितले. मात्र तो घरी पोहचला नव्हता. २१ रोजी सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास त्याचेच मामा राजेंद्र चिंतामण काळे यांच्या शेतातील विहिरीत नितीनचे प्रेत तरंगताना आढळून आले. अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल हितेश चिंचोरे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत ताडेपुरा येथील देवा धाकू पारधी वय ४० हा मजुरी करत होता. दोन दिवसांपूर्वी तो कामाला गेला होता परंतु घरी परतला नव्हता. २१ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास देवळी शिवारातील खदानीत देवा मयत अवस्थेत आढळून आला. देवाच्या आतेभावाने खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.