भरवस येथील घटना, कर्जाच्या विवंचनेत असल्याची चर्चा…
अमळनेर:- तालुक्यातील भरवस येथील ७५ वर्षीय शेतकऱ्याने गावविहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे दि. २५ रोजी पहाटे उघडकीस आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील भरवस येथे गावाचे पाणी सोडणारा पंकज पाटील हे दिनांक २५ रोजी सकाळी ७ वाजता पाणी सोडण्यासाठी गावविहिरीवर गेले व पाण्याची पातळी पाहण्यासाठी त्यांनी विहिरीत ढुंकून पाहिले असता एका इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांनी गावकऱ्यांना आवाज दिल्याने ते जमा झाले व विहिरीत पडलेला इसम आत्माराम सीताराम पाटील (वय ७५) हे असल्याचे लक्षात आल्याने त्यांच्या घरच्यांना बोलवण्यात आले. ग्रामस्थांच्या मदतीने खाटेला दोर बांधून मृतदेह बाहेर काढण्यात आला. व खाजगी वाहनात टाकून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. हे सचिन निकम करीत आहेत. सदरहू शेतकरी हा कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची गावात चर्चा होती.