चुलत भावांमध्ये झाला वाद, हाणामारीत दोघांची फुटली डोकी…
अमळनेर:- तालुक्यातील जुनवणे येथे शेतीच्या सामाईक बांधावरून सख्या चुलत भावांमध्ये वाद निर्माण होऊन सात जणांनी लोखंडी वस्तूने दोघांच्या डोक्यावर मारून रक्त बंबाळ केल्याची घटना २३ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.
जुनवणे येथील मनोज मुखत्यारसिंग पाटील यांचे व त्यांच्या चुलत भाऊ, काका-काकू यांच्याशी शेतीच्या सामायिक बांधावरून वाद सुरू होते. २१ जुलै रोजी गावकऱ्यांनी त्यांच्यात समझोता घडवून आणला होता. २३ रोजी रात्री १० वाजता मनोज पाटील आपल्या कुटुंबासह घरात झोपले असता अनिल श्यामसिंग पाटील, सुनील श्यामसिंग पाटील, त्यांचे मेव्हणे प्रवीण सुभाष पाटील, भूषण प्रवीण पाटील, प्रमोद सुनील पाटील आणि दोन अनोळखी इसम घरचा दरवाजा तोडून घरात घुसले आणि सुनील याने हातातील लोखंडी पासने मनोज यांचा मुलगा सागर याच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर अनिलने लोखंडी सळीने मारहाण केली. भांडण आवरायला गेल्यानंतर त्याने मनोजच्या डोक्यात जोराने सळीने मारहाण केली. तसेच मुखत्यारसिंग यालाही लाकडी दांडक्याने मारहाण केली. घरातील सामानाची नासधूस केली. गावकऱ्यांनी भांडण आवरले व त्यानंतर मनोज आणि सागर याना जखमी अवस्थेत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना धुळे येथे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दवाखान्यात जखमींचा जबाब घेतल्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशनला सातही जणाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.