कृषी शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांनी शेतात भेट देत केले पंचनामे…
कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे संकटांची मालिका, नुकसाभरपाईची मागणी…
अमळनेर:- तालुक्यातील झाडी, निम, मंगरूळ आदी गावातील सुमारे १०० बिघे शेतीत शेतकऱ्यांनी शासनमान्य सरदार खत मारल्यानंतर पिकाची वाढ होण्याऐवजी ते पीक कोरडे पडू लागले आहे. तण नाशकाप्रमाणे पिकावर उलटे परिणाम होत असल्याने शेतकऱ्याचे उत्पन्न हातचे गेले आहे. काल दिनांक २५ रोजी कृषी शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांनी मंगरूळ व जानवे येथे भेट देऊन पंचनामे केले.
शेतकऱ्यांनी सरदार खत दिल्यानंतर कापूस पिकाची वाढ होण्याऐवजी खताने तणनाशक सारखे काम केल्याने पिके कोमेजली होती. त्यामुळे शेतकरी व्यथित होऊन नाराजी व्यक्त केली आणि पंचनामे करून कारणमीमांसा शोधण्यात यावी आणि नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार कृषी विज्ञान केंद्राचे शास्रज्ञ डॉ गिरीश चौधरी, उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर, मंडळ कृषी अधिकारी मयूर कचरे, तालुका कृषी अधिकारी सी जे ठाकरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी देवेंद्र ठाकूर, कृषी पर्यवेक्षक अविनाश खैरनार, कृषी सहाय्यक किरण पाटील यांनी मंगरूळ येथील राजेंद्र श्रीराम पाटील यांच्या शेतात भेट दिली. तसेच जानवे येथे लाल्या रोगाबाबत प्रकाश पाटील, रवींद्र पाटील, शरद पाटील यांच्यासह अनेक शेतीत भेट दिली. शास्रज्ञ चौधरी म्हणाले की खताची लक्षणे तणनाशक सारखी आहेत. त्यात कोणता घटक आहे याचा शोध घेऊन अहवाल सादर केला जाईल. शासन स्तरावरून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच शेतकरी हिताचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली आहे.
शेतकऱ्यांनी अशी करावी उपाययोजना…
तणनाशकाच्या किंवा रासायनिक खताच्या विकृतीमुळे शेंडे खराब झालेले असतील पाने खराब झालेले असतील तर ते दुरुस्त होणार नाहीत परंतु पिकाची जोमदार वाढीसाठी प्रयत्न केल्यास नवीन येणारी फुट चांगली येईल व कालांतराने कपाशी पीक रिकव्हर होईल त्यासाठी कापूस पिकाला जमिनीतून कमीत कमी एकरी अर्धी गोणी युरिया त्यानंतर दीड टक्के युरियाची फवारणी म्हणजे १५ लिटर मध्ये सव्वा दोनशे ग्रॅम युरिया त्यानंतर लगेच चार ते पाच दिवसांनी १९-१९-१९ विद्राव्य खत, ७५ ग्राम १५ लिटर पाण्यातून फवारणी करावी युरिया आणि १९-१९-१९ विद्राव्य खताच्या फवारण्या आलटून पालटून पाच ते सहा वेळा कराव्या. मध्ये फक्त चार-पाच दिवसाचा गॅप ठेवावा, कालांतराने त्या कापसामधील तणनाशकाचा किंवा खताचा विपरीत परिणामाचा अंश कमी होईल आणि नंतरची येणारी नवीन फुट चांगली येऊन पिक रिकव्हर होईल, कापूस पिकात ओलावा टिकून राहण्यासाठी प्रयत्न करावा तसेच जमीन वापसा परिस्थितीमध्ये ठेवण्यासाठी कोळपणी करावी.
शेतकऱ्यांवर आली संकटांची मालिका…
गेल्या वर्षीपासून कापसाला भाव मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांनी कापूस घरात भरून ठेवला आहे. पावसामुळे त्याची प्रत खराब होण्याची वेळ आली आहे. काहींनी कमी भावात कापूस विकला किंवा विकत आहेत. त्यांनतर दुसरे संकट म्हणजे पावसाचे आगमन एक महिना उशिरा झाल्याने वेळेत कापूस लागवड करता आली नाही. काहींना दुबार पेरणी करावी लागली. हवामान कालमर्यादामुळे पिकाच्या उत्पन्नात घट येणार आहे. त्यात तिसरे संकट म्हणजे मध्येच लाल्या रोगाने थैमान घातल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. लाल्या रोगाने पाने लाल पडून पीक कोमेजले. काहींनी पिके उपटून फेकली. काही जेमतेम उपाययोजना करीत होते.
तोवर बोगस खताचे चौथे संकट उभे ठाकले. सुपर दाणेदार सरदार खत मारल्यानन्तर पिके वाढण्याऐवजी, टवटवीत होण्याऐवजी कोरडी पडू लागली आहेत.
मंगरूळ येथील श्रीराम बळीराम पाटील, अरुण घोलप , संजय मधुकर घोलप, कैलास दगा पाटील, अनिल कुंभार यांची सुमारे ४० बिघे, तर झाडी येथील नितीन पाटील व काही शेतकरी तसेच निम येथील काही शेतकरी असे मिळून सुमारे १०० बिघे शेतीतील कापूस खराब झाला आहे.
शेतकरी व किसान काँग्रेसकडून नुकसान भरपाईची मागणी…
यापूर्वी तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही, शेतकऱ्यांच्या पिकाचा तातडीने पंचनामा करून त्यांच्या होणाऱ्या नुकसानाची भरपाई खत कंपनी अथवा सरकारने द्यावी आणि शेतकऱ्याला वाचवावे अन्यथा यंदा शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही अशी मागणी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष प्रा सुभाष पाटील व नीलकंठ पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
शासकीय स्तरावरून जनजागृती नाही…
जिल्ह्यात इतरही ठिकाणी सरदार खतामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यावर बंदी आली मात्र ते खत मारू नये, शेतकऱ्यांकडून दुकानदाराने खत परत घ्यावे याबाबत शासकीय स्तरावर जनजागृती झाली नाही म्हणून शेतकरी खत टाकत राहिले आणि नुकसान झाले.