
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात, पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील नंदगाव येथे काल दुपारच्या सुमारास १९ वर्षीय तरुणाने दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील नंदगाव येथील गोकुळ रघुनाथ पाटील व त्यांच्या पत्नी सिमाबाई हे नेहमीप्रमाणे काल २८ रोजी शेतात गेले होते. व त्यांचा मुलगा योगेश गोकुळ पाटील (वय १९) हा एकटाच घरी होता. दुपारी दोन वाजता गोकुळ पाटील हे शेतात फवारणी करून परत आले आले व गावातील सुकदेव पाटील यांच्या गोठ्यात फवारणीचा पंप ठेवण्यासाठी गेले असता त्याठिकाणी योगेशने सुती दोरीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसून आले. ते दृश्य पाहून त्यांनी हंबरडा फोडल्याने शेजारी पाजारी गोळा झाले. त्यांनी योगेशला खाली उतरवत खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एएसआय संजय वना पाटील हे करीत आहेत.







