आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात, पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील भिलाली येथे २९ वर्षीय विवाहित तरुणाने घरात साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी ४:३० वाजेच्या घडली आहे.
तालुक्यातील भिलाली येथील दीपक कोमलसिंग गिरासे (वय २९) याने दिनांक १४ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास राहत्या घरात पुढच्या खोलीत छताच्या लोखंडी रॉडला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. सदर दीपक हा नाशिक येथे स्थायिक झालेला होता व दोन दिवसापूर्वीच नाशिक येथे त्याच्या चहा व नाश्त्याच्या हॉटेलचे उद्घाटन झाले होते. त्यावेळी त्याचे वडील नाशिक येथे आलेले होते. शेतजमीन खरेदीसाठी तो काल शिंदखेडा येथे आलेला होता. जमीन खरेदीचा व्यवहार पूर्ण करून तो भिलाली येथे आला. दुपारून त्याची आई खळ्यात गेली असता त्याने हे कृत्य केले. त्याच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार असून सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ शरीफ पठाण करीत आहेत.