पाळधी येथील सुप्रसिद्ध डॉ. व्ही आर पाटील यांनी संपविली जीवनयात्रा…
अमळनेर:- आज सकाळी सर्व दुर स्वातंञ्य दिनाच्या उत्साहात ध्वज फडकवला जात असतांना सावखेडा निमगव्हाण येथील पुलावरून पाळधी येथील डॉ. विश्वनाथ आर. पाटील यांनी सकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान तापी नदीत उडी घेवून आत्महत्या केली.
सावखेडा पुलावरून एकाने उडी घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने पुलावर मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळावर असलेल्या नॅनो गाडीत असलेल्या फोटो व चिठ्ठी वरून डॉ. पाटील यांची ओळख पटली. ही उडी घेतल्याचे समजताच पाणबुड्यांना दापोरी तांदलवाडी येथून बोलावून सकाळी साडेसात वाजेपासून ते साडेबारापर्यंत शोधाशोध केली असता मठगव्हाण दोंदवाडे काठावर प्रेत सापडले. विजय भिल, सचिन भिल, समाधान भिल, व तांदळवाडी येथील पाणबुड्यांनी या शोधकामी सहकार्य केले. यावेळी भरत निकम, पत्रकार भानुदास पाटील, तलाठी सतीश शिंदे, मंडळ अधिकारी चौधरी व पातोंडा बीट हवालदार संदेश पाटील, सुनील जाधव आदींनी प्रेताची शोधाशोध करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य केले. यावेळी उपस्थित नातेवाईक व परिचितांनी मोठा आक्रोश केला होता.
डॉ. व्ही आर पाटील धरणगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व…
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील श्री. व्ही.आर.पाटील (वय ८०) हे मुळ अंजनविहीरे ता. धरणगाव येथील रहिवाशी आहेत. पाळधी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून व्ही आर पाटील यांची ओळख आहे. कस्तुरबा नावाचे त्यांचे हॉस्पीटल आहे. श्रीराम जेष्ठ नागरिक मंडळाची त्यांनी स्थापना केली होती. तसेच संत तुकाराम महाराज पंच मंडळाचेही ते अध्यक्ष होते. पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते असल्याने त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून यात त्यांचा दलितमित्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. काल १५ ऑगस्ट रोजी ही त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात येणार होता. दरम्यान, डॉ. पाटील यांच्या निधनाची वार्ता कळताच जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानाजवळ मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरुन दि.१५ रोजी रात्री ९ वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुना जावई असा परिवार आहे.
चार पानी चिठ्ठी व फोटो ठेवून सोडला जीवनाचा मोह…
पुलावरून उडी मारण्यापूर्वी त्यांनी चार पानी चिठ्ठी घरी व घटनास्थळी नॅनो गाडीत ठेवली होती. त्यात आपला कार्यभाग उरकला असून त्यामुळे आपण हा जीवनाचा मोह सोडत असल्याचा मतितार्थ असलेला लेख सर्वांना उद्देशून लिहला आहे. डॉ. व्हि आर हे खऱ्या अर्थाने मृत्युंजय असल्याचे अनेकांनी सांगत त्यांना शेवटचा निरोप दिला.