अमळनेर:- ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनामुळे एका चालत्या बोलत्या, विद्यापीठास आपण मुकलो, असल्याची प्रतिक्रिया समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भिमराव महाजन यांनी दिली. हरी नरके यांच्या पुण्य आत्म्यास चिर शांती लाभावी अशी प्रार्थना करून अमळनेर मध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व माळी समाजाच्यावतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ यांचे प्रा. हरी नरके हे निकटवर्तीय होते. त्यांच्या निधनाने देशातील ओबीसी चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा वैचारिक आधारस्तंभ निखळला आहे असे महाजन यांनी सांगितले. माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन यानी सांगितले की, प्रा. हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये प्रा. हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे. तर महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादक हरी नरके होते. डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने २६ खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन प्रा. हरी नरके यांनी केले होते. प्रा. हरी नरके यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. यात महात्मा फुले यांची बदनामी एक सत्यशोधन आणि महात्मा फुले- शोधाच्या नव्या वाटा या दोन पुस्तकांचा समावेश आहे, असे माळी समाजाचे युवक कार्यकर्ते धीरज चव्हाण यांनी सांगितले. यावेळी माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन, सचिव गणेश महाजन, कैलास महाजन, पुरुषोत्तम महाजन, परिश्रम मतिमंद मुलांच्या शाळेचे चेअरमन योगेश महाजन, प्रा महेंद्र महाजन, युवक कार्यकर्ते धिरज चव्हाण व यासह समता सैनिक, समता प्रेमी नागरिक उपस्थित होते.