
तालुक्यातील पिळोदे येथे डीजे लावून केले जोरदार स्वागत…
अमळनेर:- भारतीय सैन्य दलाची नऊ महिन्यांची ट्रेंनिग पूर्ण करून आलेल्या अमळनेर तालुक्यातील पिळोदे येथील आदिवासी समाजाच्या फौजीची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढून त्याचे स्वागत करण्यात आले. मुलाचे होणारे स्वागत पाहून आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळून आले.
तालुक्यातील पिळोदे येथील कुंदन भीमराव सोनवणे हा आदिवासी भिल्ल समाजाचा तरुण असून त्याचे वडील गेल्या २१ वर्षांपासून गावात सालदार म्हणून काम करत असून तर आई हातमजुरीची कामे करते. कुंदनचा लहान भाऊ सतत आजारी असतो व बहीण नुकतीच १०वी पास झाली आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने कुंदन शालेय जीवनापासून आईवडिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी कधी शेतात मजूर म्हणून तर कधी बँड वाजवण्यासाठी जात असे. मात्र हे करत असताना त्याने पोलीस आर्मी भरतीची तयारीत कधी खंड पडू दिला नाही २०१८, २०१९ आणि २०२० मध्ये तो आर्मी भरतीत अपयशी ठरला, मात्र तरी त्याने जिद्द सोडली नाही. अपयश आले तरी हिंमत न सोडता त्याने ग्राउंड सोबत अभ्यासात सातत्य ठेवले त्याचीच परिणीती म्हणून २०२२ मध्ये आर्मी मधील एएससी बटालियनमध्ये भरती झाला. तेथून कुंदनच्या परिवाराचे भाग्य पालटले. गेल्या वर्षी मे मध्ये कुंदनने वडिलांना सालदारकीचे काम सोडायला सांगितले होते. हरियाणा हिमाचल प्रदेश राज्याला लागून असलेल्या कालका येथून 9 महिन्याचे प्रशिक्षण करून तो गेल्या सोमवारी पिळोदे येथे परतला असता गावातील त्याच्या मित्रपरिवाराने डी जे लावून त्याचे जोरदार स्वागत केले. यावेळी मुलाला पाहून आई वडिल गहिवरले. तर उपस्थितांच्या डोळे भरून आले, कुंदनने आर्मीची मानाची कॅप आपल्या आई वडिलांना घालून मिळालेले यश आई वडिलांना समर्पित केले. दरम्यान कुंदन याने तरुणांनी परिस्थितीचा बाऊ न करता भरतीसाठी अभ्यास आणि ग्राउंडची तयारी नियमित करावी, हिंमत सोडू नये असा सल्ला दिला आहे.







