अमळनेर:- धकाधकीचे आयुष्य जगताना आज मन:शांती मिळणे दुरापास्त झाले आहे. मी कार्यक्रमाच्या निमित्ताने काल येथे आली. त्यावेळी मला कळले, की येथे एक आगळेवेगळे व लौकिकप्राप्त श्री मंगळग्रह मंदिर आहे. मला आपसूकच मंदिराला भेट देण्याची इच्छा झाली. मी भेटही दिली आणि दर्शन, पूजा, महाआरती करण्याची संधीही मला मिळाली. त्यामुळे मनाला खूपच सकारात्मक शांती लाभली, असे भावोद्गार सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांनी काढले.
श्री मंगळग्रह देवतेचे दर्शन घेण्यासाठी त्या दिनांक १२ रोजी आल्या असता त्या सेवेकऱ्यांशी बोलत होत्या. मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस.एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, रवींद्र मोरे, सेवेकरी भरत पाटील, मनोहर तायडे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी किशोरी शहाणे म्हणाल्या, की आयुष्यात मंगळ पूजाही केली जाते, याबाबत मला फारसे माहीत नव्हते. याबाबत जेव्हा मी माझ्या ज्योतिषतज्ज्ञांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले, की आयुष्यात दोष असो वा नसो, प्रत्येकाने श्री मंगळग्रह मंदिरात जाऊन पूजा, अभिषेक केलाच पाहिजे. तुम्हाला ही संधी मिळतेय, ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. त्यानुसार आवर्जून येथे दर्शन, पूजा, महाआरती करवून घेतली. पुढच्यावेळी अभिषेकही करीन असे त्यांनी सांगितले. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ व सेवेकऱ्यांकडून मंदिरात दिली जाणारी सेवा, नियोजन, व्यवस्थापन पाहून मी भारावले आहे ते शब्दांत व्यक्त होणे, शक्य नाही. मंदिरालाही आयएसओ मानांकन मिळते, हे मला आपल्याकडूनच कळाले. श्री मंगळग्रह मंदिराला एक, दोन नव्हे तर तब्बल चार मानांकने मिळाली आहेत, ही मोठी कौतुक अन् गौरवाची बाब आहे, असेही शहाणे म्हणाल्या. याप्रसंगी मराठी चित्रपटसृष्टीतील वाटचाल, दूरचित्रवाणीवरील मालिका तसेच आगामी चित्रपट याविषयीही त्यांनी सेवेकऱ्यांशी मनमुराद गप्पा केल्या. किशोरी शहाणे मंदिरातून बाहेर पडतेवेळी अनेक भाविकांनी त्यांच्या समवेत फोटो, सेल्फी काढले.