
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील शेतकऱ्याने ऋणातून उतराई होण्यासाठी मृत गोमातेची वाजत गाजत बैलगाडीवर अंत्ययात्रा काढत अखेरचा निरोप दिला आहे.

तालुक्यातील मारवड येथील शेतकरी सुधाकर आत्माराम साळुंखे यांच्याकडे असलेली गाय दिनांक १३ रोजी मृत पावली. या गायीचे निधन झाल्यानंतर संपूर्ण परिवार हळहळला घरात चूल पेटली नाही मात्र या गोमातेला वाजत गाजत अखेरचा निरोप देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गेल्या १५ वर्षापासून सुधाकर साळुंखे यांच्याकडे असलेल्या या गाईने २ बैल व १० गायींना जन्म दिला व त्या १२ जनावरांचा आजही सांभाळ साळुंखे परिवार करीत आहे. या गोमातेने केलेल्या उपकारांची परतफेड करण्यासाठी या शेतकऱ्याने बँड लावून वाजत गाजत बैलगाडीवर मिरवणूक काढून अखेरचा निरोप दिला. सुधाकर यांनी स्वतःच्याच शेतात दफनविधी केला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर गावातील महिलांनी गर्दी करत हजेरी लावली. गाईची घरातील सदस्याप्रमाणे अंत्ययात्रा काढणाऱ्या शेतकऱ्याचे हे गाईवरील प्रेम पाहून उपस्थित ग्रामस्थ भारावून गेले होते.


