पालिकेच्या घंटागाडी व इतर वाहनांचे लोकार्पण संपन्न…
अमळनेर:- अमळनेर पालिकेने स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेतली असून अधिकारी व कर्मचारी यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांनी काढले.पालिकेच्या वतीने घंटागाड्या,ट्रॅक्टर तसेच स्वीपिंग मशीन आदींच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या आवारात लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार स्मिता वाघ, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,माजी आरोग्य सभापती शाम पाटील, माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव, मनोज पाटील,मेजर यादव,संदीप घोरपडे, विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर, हैबत पाटील,युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे,महेश जोशी आदी उपस्थित होते.
अमळनेर पालिकेने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवीन ४ घंटागाडी, २ ट्रॅक्टर,२ तीन चाकी रिक्षा व १ स्वीपिंग मशीन खरेदी केले असून त्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रास्ताविक मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले.अमळनेर पालिका ही स्वीपिंग मशीन वापरणारी जिल्ह्यातील पहिली पालिका असल्याचे प्रशांत सरोदे यांनी सांगितले. ना.अनिल पाटील पुढे म्हणाले की,आरोग्य व स्वच्छता या बाबी परस्परपूरक असून देशाचे पंतप्रधान यांनी देखील आरोग्याला प्राधान्य देत स्वच्छ भारत अभियानाचा पुरस्कार केलेला आहे.पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच पालिकेने राज्यभरात ६ व्या स्थानावर झेप घेतली आहे. माजी आमदार स्मिता वाघ यांनी देखील आपल्या भाषणात पालिकेच्या उपक्रमांचे कौतुक करत कोरोनाच्या काळात पालिकेने चांगले काम केल्याचे सांगितले.शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी केले.