प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात उत्साहात पार पडल्या मिरवणुका…
अमळनेर :- दहा दिवसांपासून भक्तांच्या हृदयात मुक्कामाला असलेल्या गणरायाला अमळनेर येथे अतिशय उत्साहात व शांततेत प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात निरोप देण्यात आला.
विसर्जनासाठी प्रशासन सज्ज होते. सुमारे ६०० कर्मचारी बंदोबस्त व मूर्ती संकलन साठी तैनात करण्यात आले होते. काही मंडळांनी दिवसा मिरवणुका काढून सायंकाळी 6 पर्यंत विसर्जन केले तर मोठ्या मंडळाच्या मिरवणुकाना सायंकाळी 6 वाजता सुरुवात झाली. शहरातील धुळे रस्त्याकडून, सुभाष चौकातून, कुंटे रोडवरून, सराफ बाजरातून , राणी लक्ष्मीबाई चौकातून येणाऱ्या सर्व गणपती मिरवणुका दगडी दरवाज्याजवळ दाखल होत होत्या. माळीवाड्यातील त्रिमूर्ती मंडळ आणि पानखिडकी येथील जय बजरंग मंडळाने मिरवणुकीत सजीव धार्मिक आरास ठेवल्याने या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या,मिरवणुका पाहण्यासाठी दगडी दरवाजा जवळ मोठी गर्दी झाली होती. काही मंडळांनी गुलाल टाळून फुल पाकळ्यांची उधळण केली होती. अनेक मंडळात बँड पथकाच्या तालावर अनेकांनी ठेका धरला,रात्री 12 च्या आत जवळपास सर्वच मंडळांच्या मिरवणुकांचे विसर्जन झाले. घरगुती गणरायाचे बोरी नदी, मंगळ ग्रह मंदिर,ताडे नाला, देवळी खदान येथे विसर्जन झाले.मंगळ ग्रह मंदिराजवळ तलावात,सावखेडा येथे तापी नदीत, आश्रमशाळेजवळ, तसेच तेल्या मारुतीजवळ विसर्जन करण्यात आले. तसेच फरशी रोड, ढेकू रोड वरील शक्ती भक्ती केंद्राजवळ, वाडी संस्थान, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह आदी ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र ठेवण्यात आले होते. पालिकेच्या वतीने मूर्ती संकलन पथक देखील तैनात होते,रात्री उशिरा या सर्व मुर्त्या विधिवत पद्धतीने विसर्जित करण्यात आल्या. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
प्रांताधिकारी महादेव खेडकर व तहसीलदार सुराणा हे सर्वत्र फिरून नियंत्रण ठेवून होते. अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, चोपड्याचे डीवायएसपी कृषिकेश रावळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्यासह १६ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ४५० पोलीस कर्मचारी, १५० पुरुष होमगार्ड, ५० महिला होमगार्ड , दोन एसआरपी पथक , दोन दंगा काबू पथक , दोन स्टॅकिंग फोर्स , १० एलसीबी पोलीस यांनी विसर्जनासाठी मेहनत घेतली.