कठीण परिस्थितीवर मात करून यश मिळवल्याने ग्रामस्थांनी केला सत्कार…
अमळनेर:- तालुक्यातील हेडावे येथील बहीण व भावाने कठीण परिस्थितीवर मात करून केंद्रीय सैन्य दलात निवड झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
हेडावे येथील रहिवासी सुरेश रमेश पाटील यांचे चिरंजीव कुणाल याची आयटीबीपी मध्ये निवड झाली. तसेच त्याची बहीण नेहा सुरेश पाटील हीची ही सीआयएसएफ मध्ये निवड झाल्याने संपूर्ण हेडावे गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. त्यांचे आईवडील सुरत येथे कामानिमित्त राहत असून आजी आजोबांकडे राहत गरिबीच्या परिस्थितीत शिक्षण घेवून बहीण व भावाने हे यश प्राप्त केल्याने ग्रामस्थांनी १९ रोजी सत्काराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदिप खैरनार यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चि. कुणाल व नेहाने आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमाला प्रसिद्ध वक्ते, लेखक व विचारवंत प्रा डॉ लिलाधर पाटील यांनी तरुणांना मार्गदर्शन केले.” ध्येय प्राप्तीसाठी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे”, असे प्रतिपादन या प्रसंगी प्रा डॉ लिलाधर पाटील सरांनी केले. अमळनेर येथील पुरोगामी कार्यकर्ते अजिंक्य चिखलोदकर यांनी देखील यावेळी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय पाटील यांनी तर आभार कांतिलाल पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाला गोकुळ पाटील, दिलिप पाटील, जितेंद्र झाल्टे,भिकन पाटील, विठ्ठल पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांचे सहकार्य लाभले. यावेळी गावातील जेष्ठ नागरिक, तरुण व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.सैन्यदलात निवड झालेल्या चि.कुणाल व नेहाचे अमळनेर विधानसभा आमदार तथा माजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील,जयश्री अनिल पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी अभिनंदन केले आहे.