
घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन…
अमळनेर:- सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्रीक्षेत्र पाडळसरे गावाची ग्रामदैवत अंबिका मातेला श्रद्धेने पुजन करून आदिशक्ती म्हणून गावकरी आपल्या ग्रामदेवतेचा अश्विन प्रतिपदेपासून म्हणजे घटस्थापना करून श्री अंबिका मातेचा शारदिय नवरात्रोत्सवास साजरा करित असतात. हभप स्वर्गीय डोंगरजी महाराज यांनी १९६१ पासुन लोकसहभागातून मकवान परिवाराच्या सहकार्याने गावात प्रथमच ग्रामदैवत अंबिका मातेचा शारदिय नवरात्रोत्सवास साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे.

हा अश्विन महिन्यातील शारदिय नवरात्रोत्सवाचा पारंपरिक उत्सव ग्रामस्थांकडून आजही अखंडपणे सुरू असून त्यात भाविकांकडून संगीत नाटक व गरबा दांडिया नृत्याची जोड देऊन शेतीची कामे लवकर पुर्ण करून रात्री उशिरापर्यंत शेतकरी महिला व नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. अंबिका मातेचा शारदीय नवरात्रोत्सवाला दिनांक १५ रोजी घटस्थापना करून नवरात्रोत्सवाची विधिवत पूजन करत सुरुवात झाली असून पंचमीपासुन ग्रामदेवी अंबिका मातेसमोर उजव्या व डाव्या बाजूस सव्वा फुटाच्या पितळी समयीत सव्वा पहार दिवस उजाडल्यावर “दिपज्योती “मंत्रोच्चार म्हणत धुप व कापूरद्वारे प्रज्वलित करण्यात येईल. दररोज देवीची मनोभावे पुजन आरती भजन व रात्री उशिरापर्यंत गावकरी अबालवृद्ध सामुहिक मनोरंजनाचे कार्यक्रम व गरबा नृत्य तसेच ग्रामीण नृत्य सादर करून उपस्थित भाविकांची मने जिंकतात. असा नित्यक्रम दरवर्षीच ठरलेला असतो त्यात या वर्षी प्रथमच प्रबोधन व देविची विवीध रूपे व इतिहासातील कथा सांगून सेवानिवृत्त अभियंता हभप ताराचंद पाटील हे आपल्या अभ्यासू पद्धतीने उपस्थित नागरिकांना सांगतात. यामुळे उपस्थित भाविक भक्तगण देवि महात्म्य ऐकून मंत्रमुग्ध होतात. यात अश्विन शुद्ध अष्टमीचा दिवस म्हणजे दुर्गाष्टमीचे व्रत म्हणजे आपल्या ग्रामदैवत अंबिका मातेचे हे व्रत सर्व ग्रामस्थांकडून न चुकता करण्यात येते.दुर्गाष्टमीला सर्व शेतीकामे बंद ठेवून दिवसभर पांच नद्यांच्या पाण्याने व पंचामृतचा मकवान परिवारातील एक विवाहीत जोडप्यांकडून सकाळीच देवीचा अभिषेक, शोडोशोपचार पुजन करून, देवीचे पाठ वाचन, दोहे, भारुड, देवीचा जोगवा गाऊन संत तुकाराम महाराज भजनी मंडळ यांची भजनाची साथ देत गावकऱ्यांना सुख शांती समृद्धी व भरघोस उत्पादनासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात येते ,दुपारी पुरोहित हभप लक्ष्मण महाराज यांच्या कडून होम हवण होऊन, त्रिरस्त्यावर बली पुजन होउन मंदिरातील देवीच्या गाभाऱ्यात कुलदैवत म्हणून प्रतिकात्मक दुर्गाष्टमीची चक्र पुजन होवून देवीला साखर व चक्री- फुटानेचा नैवेद्य दाखवून सर्व ग्रामस्थांना भंडारा वाटप होते. अंबिका मातेच्या चौकात सर्व भाविक सामुहिक व्रत सोडतात. यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन विजयादशमी पर्यत ग्रामस्थांकडून करण्यात आलेले आहेत. या सर्व कार्यात मकवान परिवार, ग्रामस्थ, शिवसरदार ग्रुप ,वाल्मिकी ग्रुपसह एकलव्य ग्रुपचे कार्यकर्ते व हभप तुकाराम महाराज भजनी मंडळाचे कार्यकर्ते हिरीरीने सहभागी होतात.

