
बाजार समितीच्या सचिवांना संचालक सचिन पाटील यांचे निवेदन….
अमळनेर:- कापसाचा जाहीर लिलाव सुरू करण्यात येवून मका व कडधान्यास योग्य भाव मिळावा यासाठी बाजार समितीच्या सचिवांना संचालक सचिन पाटील यांनी निवेदन दिले असून याप्रकरणी दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

तालुक्यात व जळगांव जिल्हयात मुख्य पिक कापुस, मका, कडधान्य असून अमळनेर बाजार समितीमध्ये मोठया प्रमाणात आवक होत असते. कापुस हा ज्या वेळेस बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत असतो. त्यावेळेस कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज होवून जात असतो. तसेच मका व कडधान्याच्या बाबतीतही असेच शेतकऱ्याला भाव मिळत नसल्याने तक्रार करीत असतात. यावर संपूर्ण संचालक मंडळासोबत चर्चा करुन तात्काळ कापसाचा जाहीर लिलाव सुरू करावा तसेच मका व कडधान्याला हमी भावापेक्षा कमी किमतीत खरेदी होवू नये याची दक्षता घेण्यात यावी. लिलावामध्ये आलेल्या शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे तात्काळ नियोजन करण्यात यावे. होणारे वाद-विवाद जागेवर दखल घेवून सोडविण्यात यावे. लिलाव करतांना व्यापारी व आडददार हे धान्य हातात घेऊन बाकी जमिनीवर सांडत धान्याची नासाडी करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करुन घाम गाळुन पिकवलेले धान्याचे या पध्दतीने नासाडी करुन त्यांचे आर्थिक नुकसान होत असते.
वरील सर्व विषय गांभिर्याने घेवून तात्काळ अंमलबजवाणी करण्यात यावी, तसे न झाल्यास आम्हांला नाईलाजास्तव उपोषणास बसावे लागेल किंवा मोर्चा काढावा लागेल, असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.

