मागील काळात गाळे लिलावात झालेल्या गैरप्रकाराबाबत चौकशी समिती नेमणार…
बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले अनेक खुलासे…
अमळनेर:- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वच संचालक सत्ताधारी असून सत्ताधारी व विरोधक असा विषयच नसल्याने गटातटाचा प्रश्नच येत नाही, असा दावा सभापती अशोक आधार पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र गेल्या काळात मार्केटमधील गाळे लिलावात अनियमित कारभार झाल्याचा भांडाफोड करीत यासाठी चौकशी समिती नेमण्याचा इशारा त्यांनी दिला.
बाजार समितीबाबत काहींनी उलटसुलट प्रचार सुरू केल्याने यासंदर्भात खरी परिस्थिती मांडण्यासाठी अशोक पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मंत्री महोदय ना अनिल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने त्यांच्या पॅनलला बहुमत दिले असुन त्यानंतर राज्यात झालेल्या घडामोडीमुळे विरोधातील संचालक देखील सहयोगी झाले आहेत. मी सभापती झालो तेव्हापासून आम्ही पाच सहा महिन्यांतच कारभाराची सिस्टीम बदलली आहे.प्रत्येक महिन्याला अजेंड्यावर येणारे विषय,त्यावर सविस्तर चर्चा,प्रत्येक महिन्यात झालेल्या रुपयां रुपया खर्चाचे वाचन, याठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नसताना आरओचे शुद्ध व थंडगार पाणी आम्ही शेतकरी, हमाल मापाडी आदी सर्वांसाठी स्वखर्चाने उपलब्ध करून दिले,मुख्य प्रवेशद्वारला बळीराजा नामकरण केले,शेतकऱ्यांचा मोफत विमा तो देखील मार्केटवर बोजा पडता काढला गेला,संरक्षणाची बाब म्हणून सीसीटीव्हीचे नियोजन केले, भविष्याची आर्थिक बचत म्हणून सोलरचे काम प्रोसेसमध्ये आहे, यासाठी नामदार अनिल दादा पाटील यांच्या मदतीने डीपीडिसी मधून एक कोटी निधी उपलब्ध होणार आहे. शेतकरी निवास आणि भोजनालय साठी प्रस्ताव तयार असून 50 टक्के सबसिडीवर पणन मंडळाकडून ती योजना मिळणार आहे.याव्यतिरिक्त तालुक्यास मंत्री अनिल पाटील यांच्या रूपाने प्रथमच मंत्री पदाचा बहुमान मिळाल्याने पहिला नागरी सत्कार समारंभ मार्केट मध्ये घेण्यात आला. कापसासाठी महिलांचे प्रशिक्षण आणि सोसायटीचे चेअरमन व व्हा चेअरमन यांचे प्रशिक्षण देखील आपण घेतले. गणेशोत्सवात केदारनाथची प्रतिकृती सादर करून गणेशभक्तांची मने जिंकली असे अनेक चांगले उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.
भविष्यातही चांगल्या योजना…
आमचे संचालक मंडळ एवढ्यावरच थांबले नसून नामदार अनिल दादांच्या नेतृत्वाखाली नवनिर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे. मुख्य रस्त्यालगत मार्केटच्या संकुलातील वरच्या बाजूला गाड्यांचे काम अपूर्ण असल्याने तेथे टाकलेला पैसा वायफळ झाला आहे.त्याठिकाणी मार्केटवर कोणताही बोजा न येता सारस योजनेतून स्वतः घेणाऱ्यांनी बांधून वापरायचे या तत्वावर 100 गाळे निर्माण करणार आहोत यातून जी अनामत रक्कम जमा होईल त्यातून ती कर्जफेडीसाठी वापरायचे नियोजन असून त्यामुळे मार्केटचा बोजाही कमी होईल आणि भाडे सुरू झाल्यावर मार्केटचे उत्पन्न देखील वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यतिरिक्त शेतकरी निवास व भोजनालय निर्मिती,हमाल व मापाडी भवनाचे पुनर्जीवन, शेतकरी सुविधा केंद्र, पूर्वी तत्कालीन सभापती तथा आताचे मंत्री अनिल दादा पाटील यांनी शेतकरी हितासाठी राबविलेला खुला कापूस खरेदी लिलाव पुन्हा सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त करत, त्यासाठी जिनर्सशी बोलणे सुरू असून प्रस्तावित कोल्ड स्टोरेज देखील उभारण्याचे प्रयत्न असल्याचे सभापतीनी सांगितले.
नोकरभरतीबाबतही केला अपप्रचार…
नोकरभरतीबाबत बोलताना सभापती पाटील म्हणाले की, याबाबत चुकीचा अपप्रचार होत असून कायम नोकरभरती करण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही,खरेतर आतापर्यंत इथे पुढाऱ्यांचीच मुले भरली गेली आहेत,आजही खेडा खरेदी,भरारी पथक यासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याने काही कंत्राटी कर्मचारी घेण्याची संकल्पना आम्ही मांडली आहे. त्यातही वायरमन, वेल्डर, सॉफ्टवेअर संगणक तज्ञ आदींना प्राधान्य देण्याचा मानस आहे मात्र अजून कोणतीही तशी परवानगी आम्ही घेतलेली नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
मार्केटच्या बैठकीत पावित्र्य राखले पाहिजे…
दि १८ ऑक्टोबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काहींनी मिटिंगचे पावित्र्य न राखता द्वेष डोक्यात ठेऊन विनाकारण राडा घालायचा म्हणून घातला, सभापतीना अरेरावीचेही प्रकार घडले,यावेळी महिला संचालक उपस्थित असताना अश्लील शिवीगाळ देखील केली गेली, हे अशोभनीय असून अश्या बैठकीत आम्ही का म्हणून यावे अशी तक्रार महिला संचालकांनी केली आहे.आणि पूर्वीची अवाजवी खर्चाची प्रथा आम्ही मोडीत काढली असून आम्ही सर्व खरे शेतकरी पुत्र असल्याने चुकीचे काम किंवा चुकीचे खर्च करणारच नाहीत अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.आणि यापुढे कुणीही बैठकीत असे असभ्य प्रकार केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा अशोक पाटील यांनी दिला.
गोडावून लिलावाची अनियमितता तपासणार…
तत्कालीन संचालक मंडळाने ४८ गोडावून चा ओपन लिलाव केला, यासाठी प्रत्येकी आठ ते दहा लाख अनामतही घेतली,रक्कम घेतली गेली असताना लिलाव रद्द केला आणि पैसेही परत केले त्यानंतर तेच गोडावून फक्त एक लाख रुपये घेऊन दिले गेले असे होण्याचे कारण काय ? मार्केटला मोठी अनामत मिळाली असताना ती परत दिलीच का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून हा अनियमित प्रकार वाटत असल्याने याची सहकार क्षेत्रातील तज्ञ लोकांची समिती नेमून चौकशी केली जाईल व गैर प्रकार व अपहार आढळल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल असा इशारा अशोक पाटील यांनी दिला व भ्रष्टाचार करणार ही नाही आणि कुणाचा सहन देखील करणार नाही असा खुलासा देखील त्यांनी केला.
सदर पत्रकार परिषदेत संचालक समाधान धनगर, प्रकाश अमृतकर, पुष्पा विजय पाटील, भाईदास सोनू भिल, शरद पाटील व सचिव उन्मेष राठोड उपस्थित होते.